
राज्यावरील नैसर्गिक आपत्तींची मालिका आणि त्यातून होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी भारतीय हवामान विभाग आणि राज्य सरकारच्या जल संधारण विभागाने पुणे वेदरलाईव्ह अॅप तयार केले आहे. 80 स्वयंचलित हवामान केंद्रांच्या माध्यमातून पुणे जिह्यातल्या प्रत्येक गावातील हवामान बदलाच्या अद्ययावत माहितीच्या जोडीला रडार व उपग्रहाच्या छायाचित्रांमुळे हवामानाचा ताजा अंदाज अॅपवर मिळेल. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या मुकाबल्यासाठी सज्ज राहता येईल. नजीकच्या भविष्यात राज्यातल्या सर्व स्मार्ट सिटीसाठी हवामानविषयक अॅप तयार होण्याची चिन्हे आहेत.
मुंबईमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने मुंबई वेदरलाईव्हचा यशस्वी प्रयोग राबवल्यानंतर भारतीय हवामान विभागाने पुणे वेदरलाईव्हचा प्रयोग राबवला आहे. राज्य सरकार व लोकसहभागातून राबवलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे जिह्यात 80 स्वयंचलित हवामान केंद्रे उभी राहिली आहेत. या हवामान केंद्रांमधून प्रत्येक पंधरा मिनिटाला मिळणारी स्थानिक हवामानविषयक माहिती व रडार आणि उपग्रहातून मिळणाऱया ताज्या छायाचित्रांच्या माध्यमातून पुणे वेदरलाईव्ह अॅप तयार करण्यात आले आहे.
केंद्रांचा फायदा
सोलर पॅनल आणि मोबाईल सीमकार्डच्या मदतीने चालणाऱया या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून वाऱयाची दिशा व वेग, कमाल आणि किमान तापमान आर्द्रता हवेचा दाब, हवामानातील चढउतार मोजले जातात. तसेच स्वयंचलित पर्जन्यमान केंद्रातून किती पाऊस झाला याची माहिती मिळते. याचा फायदा हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी हवामान विभागाला होतो.
राज्यातील मोठय़ा स्मार्ट शहरांत राज्य सरकारच्या वतीने अशा प्रकारे यंत्रणा निर्माण करता येईल. अशा प्रकारचे उपक्रम राबवणे गरजेचे आहे. – डॉ. कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ वैज्ञानिक, भारतीय हवामान विभाग, पुणे
लोकसहभागातून केंद्रांसाठी जागा
स्वयंचलित केंद्रे उभारण्यासाठी हवामान विभागाकडे येवढय़ा जागा नव्हत्या. त्यामुळे ही केंद्रे उभी करण्यासाठी विविध संस्था, शाळा, शेतकरी आणि पुण्यातील हवामान विभागाच्या कर्मचाऱयांनी स्वतःच्या जागा या स्वयंचलित हवामान केंद्रासाठी दिल्या आहेत.
उपयोग कोणाला
कृषी विभाग, शेतकरी, हवामान विभाग, हवाई वाहतूक, आपत्कालीन विभाग, पर्यटक व कॉर्पोरेट सेक्टरला हवामानाची ताजी माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळेल.
दहा दिवसांत अॅप
पुणे वेदरलाईव्ह अॅप तयार आहे त्याच्या चाचण्या सुरू आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत सर्वांना उपलब्ध होईल.
































































