
गेल्या दहा महिन्यांत आम्ही 17 हजार डोळ्यांचे रुग्ण तपासले. त्यामध्ये 25 ते 40 वयोगटातील अनेकांना चष्मा लागला. देशात साधारण 33 टक्के लोकांना चष्मा आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होममुळे अनेकांना डोळ्यांचे आजार सुरू झाले. सातत्याने संगणक, लॅपटॉप, मोबाईलवर काम केल्याने अनेकांना चष्मा लागला आहे. या काळात लहान मुलांमध्येही मोबाईलवर मोठय़ा प्रमाणात गेम खेळणे किंवा ऑनलाइन अभ्यासक्रम यांचे प्रमाण वाढल्याने दृष्टिदोष आढळून येऊ लागले आहेत. लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होममुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमचे रुग्ण वाढत आहेत अशी माहिती इन्किगो आय केअरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना दिली.
पावसाळ्यात डोळ्यांचे आजार आढळून येतात. त्यामध्ये डोळे येणे, डोळे कोरडे होणे, डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, केराटायटिस हा आजारही अनेकांना आढळून येतो. अस्वच्छ लेन्समुळे अनेकदा केराटायटिस होतो. बाह्य नेत्रपटल म्हणजेच कॉर्निआवर हा संसर्ग होत असल्याने आंधळेपणा येण्याचा धोकाही अधिक असतो. ट्रकोमा हा आजारही अनेक रुग्णांमध्ये दिसून येतो. साधारण जगामध्ये 1.5 दशलक्ष रुग्णांमध्ये हा आजार दिसून आला आहे. त्यावर उपचार करणेही कठीण आहे. पावसामध्ये डोळे चुरचुरणे, डोळ्यांमध्ये आग होणे, खुपणे यांसारखे आजार उत्पन्न होतात. म्युकरमायकोसिस हा आजार सध्या आपण अनुभवतो आहोत. या आजार टाळण्यासाठी मुळात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. न धुतलेल्या पालेभाज्यांचे सेवन करू नये. एकमेकांचे टॉवेल वापरू नयेत. अनेक वेळा स्विमिंग पूलमध्ये दूषित पाणी आणि क्रोटोझोवा असल्याने डोळ्यांना आजार होतात, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले.
डॉ. श्रीधर ठाकूर यांची माहिती
- हा आजार तीन वर्षांच्या मुलांपासून वयस्कर आजी-आजोबांनाही होऊ शकतो. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हा डोळ्यांना त्रास देणारा आजार आहे.
- हे सर्व टाळण्यासाठी मॉनिटर हा डोळ्यांच्या उंचीपासून खाली चार ते पाच इंचांपर्यंत असावा. स्क्रीन आणि डोळ्यांमध्ये कमीत कमी दोन फुटांचे अंतर ठेवावे. वाकून मॉनिटरकडे पाहू नये. खुर्चीला हात टेकलेले असावेत. पायाचे तळवे जमिनीवर टेकलेले असावेत.
कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे काय
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हालचाली कमी झाल्या आहेत. वर्क फ्रॉम होममुळे अनेक जण संगणक, लॅपटॉपवर काम करतात. मोबाईलचाही वापर वाढला आहे. या सर्व प्रकारांमुळे आपल्या डोळ्यांचे काम वाढले आहे. डोळ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे अनेक वेळा डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे, डोळे कोरडे होणे, डोळे दुखणे असे प्रकार होतात. संगणक किंवा मोबाईल स्क्रीनकडे आपण एकटक पाहत राहिल्यामुळे डोळ्यांच्या पापण्यांचे लवणे थांबते. डोळ्यांच्या पापण्या या डोळ्यांमध्ये ओलावा निर्माण करण्याचे काम करतात, पण आपण एकटक संगणकाकडे पाहत राहिल्याने पापण्यांच्या हालचाली थांबतात आणि डोळे कोरडे होताच थकवा येतो. डोळे लाल होतात, खुपू लागतात. यालाच कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हटले जाते.























































