यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच, समन्वय समितीच्या निर्णयानंतर मंडळांचे एकमत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील काही भागांत ओढावलेली पूरग्रस्त परिस्थिती आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि आसपासच्या परिसरात यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावे, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. समन्वय समितीच्या या आवाहनाला अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून राज्य सरकारच्या नियमांचे पालन करूनच यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यावर मंडळांचे एकमत झाले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारने 29 जून रोजी नियमावली जाहीर केली होती. यासंदर्भात समन्वय समितीच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांच्या अनेक बैठका देखील पार पडल्या होत्या. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि राज्यातील काही भागांवर ओढावलेले पूरसंकट लक्षात घेता समन्वय समितीने गुरुवारी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ऑनलाईनरीत्या पार पडलेल्या या बैठकीत यंदाचा गणेशोत्सव ही साधेपणाने आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करूनच उत्सव साजरा करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी जाहीर केले.