
>> अभिपर्णा भोसले
सुरक्षा समितीचे अध्यक्षपद हे इंग्रजी वर्णमालेतील क्रमानुसार मिळते. सुरक्षा समितीची सभा हॉर्स शू आकाराच्या टेबलभोवती भरते. दर महिन्याला प्रत्येक देशाची जागा उजव्या दिशेने पुढे सरकत जाते. काही महिन्यांनी टेबलप्रमुखाचे स्थान मिळाल्यानंतर त्या देशाला त्या महिन्यासाठी सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळते. हे पद अत्यंत जबाबदारीचे असते. ऑगस्ट 2011 आणि नोव्हेंबर 2012नंतर या दशकात हिंदुस्थानला पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळाले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अध्यक्षपद हिंदुस्थानला मिळाले. ते एक महिन्यासाठी मिळाले असले तरी या एक महिन्यामध्ये समितीसमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत. यात नाविक सुरक्षा, दहशतवादविरोधी मोहीम आणि शांतिसेना हे विषय हिंदुस्थानच्या अजेंडय़ावर असतील. त्यावर चर्चा घडवून आणली जाईल आणि सुरक्षा समितीच्या सदस्य राष्ट्रांचे एकमत होईल असे पाहिले जाईल, असे संयुक्त राष्ट्रांतील हिंदुस्थानचे कायमस्वरूपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी स्पष्ट केले. हे विषय जागतिक पटलावरील घडामोडी आणि दहशतवादाचा वाढलेला धोका लक्षात घेऊन निवडण्यात आले आहेत.
सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या देशाकडे सुरक्षा समितीचे सदस्य असलेल्या देशांमध्ये समन्वय साधण्याचे काम असते. संयुक्त राष्ट्रांचा सेक्रेटरी जनरल हा सुरक्षा समितीचा सचिव असतो. त्यामुळे सुरक्षा समितीच्या कामकाजाचा अहवाल सेक्रेटरी जनरलकडे देणे हेही अध्यक्षाचे काम असते. जागतिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घडलेली कोणतीही नवीन घटना आणि त्यासाठी उचलली गेलेली पावले यांची माहिती संयुक्त राष्ट्रांना देण्याचे काम सुरक्षा समितीच्या अध्यक्षाकडे असते. त्यामुळे हे पद महत्त्वाचे आहे. सुरक्षा समितीमध्ये जे ठराव पास केले जातात त्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्याची जबाबदारी ही आफ्रिकन युनियन, आसियान, सार्क अशा प्रादेशिक संघटनांकडे दिली जाते. संयुक्त राष्ट्रांमधील हिंदुस्थानचा कायमस्वरूपी प्रतिनिधी आणि इतर राजदूत यांच्यावर ही जबाबदारी असेल. हिंदुस्थानने निवडलेल्या विषयांपैकी सागरी सुरक्षेचा मुद्दा अनियंत्रित सागरी व्यापार आणि छोटय़ा देशांच्या विशेष आर्थिक विभागांवर मोठय़ा देशांनी मिळवलेला कब्जा यांवर निर्बंध घालण्यावर भर देईल. अशा पद्धतीच्या गुह्यांकडे अंतर्गत सुरक्षेच्या गुह्यांप्रमाणेच गांभीर्याने पाहिले जावे आणि कडक नियमावली अमलात आणली जावी असा हिंदुस्थानचा प्रयत्न असेल. अर्थात यामागे हिंदी महासागरातील आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाची पार्श्वभूमी आहे. या भागातील सर्व देशांमध्ये हिंदुस्थान हा सर्वांत मोठा देश असल्याने या देशांची बाजू मांडण्यासाठी हिंदुस्थानने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. संयुक्त राष्ट्रांनी आखून दिलेले सागरी नियम पाळले जावेत यासाठी आग्रही असणे आणि या नियमांना असलेल्या पळवाटा लक्षात आणून देणे ही हिंदुस्थानची जबाबदारी असेल.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील पाच कायमस्वरूपी सदस्य राष्ट्रांमध्ये असलेला चीनचा समावेश ही हिंदुस्थानसाठी दुखरी नस आहे. ज्यावेळी पाश्चात्य राष्ट्रे साम्यवादी चीनला वेगळा देश म्हणून मान्यता देण्यास सहजासहजी तयार होत नव्हती त्यावेळी हिंदुस्थानने चीनचा एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून पुरस्कार केला तसेच सुरक्षा समितीमध्ये आशियातील एक महत्त्वाचा देश म्हणून चीनला कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी पाठपुरावाही केला. परंतु त्याची परतफेड म्हणून हिंदुस्थानच्या पदरात चीनकडून वेळोवेळी निराशाच आली आहे. हिंदुस्थानला सुरक्षा समितीचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळू नये, हिंदुस्थान-पाकिस्तान संबंधांमध्ये हिंदुस्थानचे पारडे जड होऊ नये, हिंदुस्थानच्या दहशतवादविरोधी लढय़ाला महत्त्व दिले जाऊ नये यासाठी चीन प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. सुरक्षा समितीतील महत्त्वाच्या देशांपैकी चीनची अनुकूल भूमिका हे हिंदुस्थानसाठी आव्हान असेल. सागरी सुरक्षेच्या मुद्दय़ावर एकमत मिळवताना हिंदुस्थानची ओढाताण होऊ शकते; कारण जगातील इतर कोणत्याही महासत्तेपेक्षा चीन अधिक महत्त्वाकांक्षी आणि हिंदुस्थानच्या शेजारील राष्ट्र असल्याने सर्वाधिक धोकादायकदेखील आहे. संयुक्त राष्ट्रांनी नेमून दिलेल्या सागरी नियमांना वळसा घालून चीनची दक्षिण चिनी समुद्रात सुरू असलेली आगेकूच आणि तेथील छोटय़ा देशांच्या अधिकारांवर आलेली गदा सर्वज्ञात असली तरी चीनला उघड उघड विरोध करण्याचे धारिष्टय़ इतर मोठे देश दाखवतील का, हा प्रश्नही कळीचा आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षांना वेसण घालणारा कोणताही ठराव चीन सहजासहजी पारित होऊ देणार नाही. त्याऐवजी इतर देशांना हाताशी घेऊन चीनला या मुद्दय़ावर एकटे पाडल्यास बाकीचे देश भविष्यात कधीतरी या विषयावर आलेल्या ठरावावर चीनची बाजू उचलून न धरता इंडो पॅसिफिक आणि हिंदी महासागर क्षेत्रातील देशांचा विचार करतील. त्यासाठी अनुकूल असे वातावरण तयार करण्याची ही नामी संधी आहे.
शांतिसेनांमध्ये मोठय़ा राष्ट्रांच्या लष्करी बळाचा समावेश असल्याने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित स्वरूपाचा आहे. सुरक्षा समितीने नव्याने शांतिसेना तैनात करण्यालाही पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. शांतिसेनेच्या मुद्दय़ावर हिंदुस्थानची प्रतिमा नेहमीच संयुक्त राष्ट्रांच्या धोरणांना अनुकूल अशी राहिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून हिंदुस्थानने वेळोवेळी आपले सैन्य शांतिसेनेमध्ये दाखल केले आहे, वेगवेगळ्या मोहिमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे, काही ठिकाणी नेतृत्व केले आहे आणि 176 हिंदुस्थानी सैनिकांनी हौतात्म्यदेखील पत्करले आहे. शांतिसेना ही दोन परस्परविरोधी सशस्त्र्ा गटांमध्ये समझोता घडून येईपर्यंत सामान्य जनतेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणारी सेना आहे. या सेनेला दोन्ही गटांकडून हल्ल्याचा धोका असतो. त्यामुळे शांतिसेनेला अधिकाधिक सुरक्षित ठेवण्यासाठी काय करता येईल यासंदर्भातही चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे. सीरिया, लिबिया, इराक, सोमालिया, येमेन, माली, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, लेबनॉन आणि अफगाणिस्तान ही दहशतवादाला बळी पडलेल्या देशांची उदाहरणे आहेत. आयसिस आणि तत्सम दहशतवादी संघटना, जिहादी गट, जगाच्या नकाशावरील लष्करी बंडाळ्यांची क्षेत्रे, तालिबानसारख्या लष्करी दहशतवादी संघटना राजकीय सत्ता होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेची गरज अजून वाढली आहे.
संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतरीत्या दहशतवादाची व्याख्या केलेली नाही. एका देशासाठी असलेला दहशतवादी हा दुसऱया देशाच्या हितसंबंधांसाठी लढणारा सशस्त्र सैनिक असतो. त्यामुळे राष्ट्राराष्ट्रातील संघर्षाच्या मुद्दय़ांवर जोपर्यंत जागतिक एकमत होत नाही तोपर्यंत कोणत्याही एका देशाच्या दहशतवादाच्या आरोपांचे समर्थन करणे आणि दुसऱया देशाला उघड उघड दहशतवादाचा समर्थक ठरवून मोकळे होणे हे संयुक्त राष्ट्रांच्या आदर्शांमध्ये बसत नाही. अगदी पाश्चात्य राष्ट्रांनाही दहशतवादाचा सामना करावा लागला असला तरी कोणत्याही एका देशाविरुद्ध जागतिक मत तयार करणे हे पाश्चात्य राजकीय मुत्सद्देगिरीला धरून नाही. दहशतवादविरोध हा हिंदुस्थानचा कायमस्वरूपी अजेंडा राहिला आहे कारण दहशतवादाचा जागतिक शांततेला असलेला धोका कमी झालेला नाही. पाकिस्तानसारखे सशस्त्र दहशतवादाला खतपाणी घालणारे, आर्थिक मदत पुरवणारे देश संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत ज्या ज्या वेळी दहशतवाद चर्चेस येतो त्या त्या वेळी ‘हा अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा आहे’ असे म्हणून विषय बदलण्याचा प्रयत्न करतात. यात तुर्कस्तान, मलेशिया, कतार अशा छोटय़ा राष्ट्रांचाही समावेश होतो. त्यामुळे दहशतवाद हा पूर्णतः अस्वीकारार्ह असून त्याचे कोणत्याही प्रकारचे समर्थन केले जाणार नाही असे संयुक्त राष्ट्रांतील हिंदुस्थानचे कायमस्वरूपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी विशेष नमूद केले. तालिबानसारख्या दहशतवादी संघटनेचा राजकीयशक्ती म्हणून शेजारील अफगाणिस्तानात उदय होत असताना हिंदुस्थानसाठी दहशतवादाविरुद्ध ठोस आंतरराष्ट्रीय मत तयार करणे ही काळाची गरज आहे. जागतिक शांततेचा पुरस्कार करणाऱया देशांना दहशतवादाच्या टांगत्या तलवारीचा विसर पडू नये याची काळजी घेतली जाईल. आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी ठरावाच्या आवश्यकतेवर एकमत मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे कायमस्वरूपी सदस्यत्व हिंदुस्थानला कधी मिळणार हादेखील अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न आहे. हिंदुस्थानबरोबरच जर्मनी, जपान, ब्राझील हे देशही कायमस्वरूपी सदस्यत्वाची मागणी लावून धरत आहेत. सुरक्षा समितीच्या सदस्यत्व विस्तारावरील चर्चा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये प्रलंबित आहे. कायमस्वरूपी सदस्यत्वाची गरज काय याचे उत्तर अमेरिका, यूके आणि फ्रान्स यांचा जागतिक शांततेसाठी योग्य ती पावले उचलण्याचा आग्रह आणि रशिया आणि चीनचा मानवी हक्क संरक्षणाच्या नावाखाली कोणत्याही हस्तक्षेपास असलेला विरोध यामध्ये दडलेले आहे. इतरही देश कायमस्वरूपी सदस्य झाल्यास बहुमताच्या आधारे लोकशाहीपूरक असे निर्णय घेण्यास मदत होईल.
2011मध्ये हिंदुस्थानला सुरक्षा समितीचे अध्यक्षपद मिळाले असताना सीरिया हा जगासमोरील अत्यंत गंभीर विषय होता. सीरियाच्या अनुषंगाने मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर रशिया आणि चीन नकारात्मक मत देत असत; परंतु हिंदुस्थानकडे अध्यक्षपद आल्यानंतर सीरिया प्रश्नावर जो अध्यक्षीय प्रस्ताव पारित करण्यात आला त्यावर रशिया आणि चीन यांच्याकडून संमती मिळवण्यामध्ये हिंदुस्थानी प्रतिनिधींना यश प्राप्त झाले होते. सुरक्षा समितीच्या इतिहासामध्ये प्रश्नावरील तो एकमेव प्रस्ताव आहे ज्याला रशिया आणि चीनने विरोध केला नाही. अर्थात अध्यक्षीय प्रस्ताव आणि ठराव यामध्ये निश्चयात्मक फरक असला तरी हिंदुस्थानने समन्वयकाची भूमिका यशस्वीरीत्या निभावल्याचे हे उदाहरण आहे. या वेळी मिळालेल्या संधीतही हिंदुस्थान सामोपचार आणि संवादावर भर देणारी मुत्सद्देगिरी वापरेल अशी अपेक्षा आहे. सागरी सुरक्षा, शांतिसेना आणि दहशतवाद या विषयांवर अधिकृत मत व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता हिंदुस्थानकडे नक्कीच आहे. या विषयांवरचे कायमस्वरूपी जागतिक ठराव जरी अस्तित्वात आले नाही तरी अध्यक्षीय अहवालामध्ये हे मुद्दे अधोरेखित करून त्यावर सर्व सदस्य राष्ट्रांचे एकमत मिळवण्यात हिंदुस्थानला यश मिळेल, अशी आशा आहे.
(लेखिका दिल्ली विद्यापीठात कायद्याच्या विद्यार्थिनी आहेत)





























































