
>> प्रा. शरयू जाखडी
संत नामदेवांनी भागवत धर्माच्या प्रचारार्थ पंजाब प्रांतापर्यंत पायी वारी करून ज्ञानविचारांचा प्रसार केला. त्यांच्या या कार्याचा ठसा शिखांच्या आदिग्रंथातही उमटलेला दिसून येतो. भगवदप्रेमाची गोडी लावत जनजागरण करण्याचे अलौकिक कार्य त्यांनी केले. संत नामदेवांनी विठ्ठल भक्ती आणि संतविचार पंढरपूरपासून गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबपर्यंत विस्तारले.
प्रत्येक संताची आत्मविकासाची ईश्वरी अनुभूती – जवळ जवळ सारखी असते, परंतु त्यांची समाज जागरणाची भूमिका भिन्न प्रकारची असते. काही संत आत्मज्ञान प्रकाशानंतर अंतर्मुख होऊन स्वान्तसुखास ईशचिंतनात कालक्रमणा करतात तर काही संत आपल्याला जे ज्ञान प्राप्त झाले ते ‘आता उरलो उपकारापुरता’ या मानसिकतेतून ज्ञानदान करत इतरांनाही भगवप्रेमाची गोडी लावतात. संत नामदेव हे दुसऱया प्रकारच्या संतांत मोडतात. संत नामदेवांनी भागवत धर्माच्या प्रचारार्थ पंढरपूर ते थेट पंजाब प्रांतापर्यंत पायी वारी करून ज्ञानदेवांनी दिलेल्या ज्ञानविचारांचा प्रसार केला. त्यांनी त्यासाठी प्रामुख्याने कीर्तन माध्यम निवडले. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।’ हे जणू ब्रीदवाक्य घेऊन नामदेवांनी नामगजराच्या कल्लोळात भक्तीचा डांगोरा पिटत जनजागरण केले. संत नामदेवांच्या सुमारे 800 वर्षांपूर्वीच्या या कार्याची अपूर्वाई निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. खडतर प्रवास करीत पंजाबपर्यंत गेलेल्या या संताच्या कार्याचा ठसा ‘भक्त नामदेव की मुखबानी’ या नावाने शिखांच्या ‘ग्रंथसाहेब’ या आदिग्रंथात उमटलेला दिसतो. महाराष्ट्राच्या या पंढरपूरनिवासी संताने पंजाबी भक्तांची मने जिंकून आपल्या कार्यप्रसारार्थ पंजाब प्रांतात अनेक वर्षे व्यतित केली. तसेच उत्तरेकडील हिंदी व पंजाबी भाषा आत्मसात करून त्यांच्याच भाषेत रचना करून कीर्तनाद्वारा त्यांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या या प्रचारक संताची ही फार मोठी कामगिरी कौतुकास्पद आहे. उत्तरेकडील तीर्थयात्रा करताना त्यांनी हे मोठे कार्य केले आहे. द्वारका, मारवाड, बिकानेर, मथुरा, हरिद्वार, पंजाब अशा अनेक ठिकाणी त्यांनी कीर्तने केली. राजस्थानातील 108 जिल्हय़ांत नामदेवांची 52 मंदिरे असल्याची माहिती मिळते. संत बहिणाबाईच्या ‘संतकृपा झाली इमारत फळा आली’ या अभंगात नामदेवांचे वर्णन तिने पुढीलप्रमाणे केले आहे ती म्हणते. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया।
‘नामा तयाचा किंकर तेणे विस्तारिले आवार।’
संत नामदेवांनी विठ्ठल भक्तीचे हे आवार पंढरपूरपासून गुजरात सौराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबपर्यंत विस्तारले. संत बहिणाबाईचे उद्गार संत नामदेवांनी सार्थ केले आहेत. पंजाब प्रांतातील घुमान गावी संत नामदेवांचे वास्तव्य काही वर्षे होते. त्यामुळे इ.स. 2015 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमानला भरवण्यात आले. संमेलनाचा मान तेथील सरहद संस्थेला देण्यात आला. त्यावेळी प्रसिद्ध हिंदी कवी गुलजार यांनी केलेल्या सूचनेनुसार घुमान येथे संत नामदेवांच्या कार्यक्षेत्राच्या गावी इ.स. 2016 पासून दरवर्षी अखिल भारतीय सर्व भाषिकांचे साहित्य संमेलन भरवावे आणि मराठी भाषिकांनी त्यात पुढाकार घ्यावा. सरहद संस्थेने याकामी सहाय्य करावे. यावरून असे म्हणता येईल की मराठी भाषेला अखिल भारतीय साहित्य क्षेत्रात मानाचे पान संत नामदेवांनी मिळवून दिले आहे.
संतांनी आपली आत्मचरित्रे लिहिण्याची प्रथा त्याकाळी नव्हती. तथापि संत नामदेवांचे वैशिष्टय़ असे की वाङ्मयीन व ऐतिहासिकदृष्टय़ा आत्मचरित्र लिहिण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले आहे. संत नामदेवांचे हे वेगळेपण संतकार्यात उठून दिसते. त्यादृष्टीने पहिल्या आत्मचरित्रकाराचा मान नामदेवांना द्यायला हरकत नाही. ‘तीर्थावळी’ या प्रकरणात संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांबरोबर केलेल्या उत्तरेकडील तीर्थयात्रेचे वर्णन आहे. आदि-समाधी तीर्थावळी या प्रकरणातून त्यांनी संत ज्ञानदेवांचे चरित्र तर गायिले आहेच, परंतु संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीचे भावपूर्ण वर्णन केले आहे. त्यांच्या या चरित्रपर रचनेमुळे संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीचा प्रत्यक्षदर्शी पुरावा उपलब्ध झाला. संतांची आत्मचरित्रे नसल्याने त्यांच्या चरित्रात अनेक वेळा दंतकथा समाविष्ट होतात.
कल्याणी गावात गोमा नावाचा एक हरिभक्त शिंपी होता. त्यांच्या पत्नीचे नाव उमा. त्यांना गोणाई नावाची एक मुलगी होती. कृष्णाकाठी असलेल्या नरसी गावच्या विठ्ठलभक्त दामाशेटशी गोणाईचे लग्न झाले. त्यांचे पहिले अपत्य आऊबाई. नंतर गोणाईंने मुलासाठी नवससायास, उपासतापास केले. नामदेव गोणाईच्या पोटी जन्माला आले. अशारीतीने नरसी गावी विठ्ठलभक्तीची परंपरा असलेल्या घराण्यात नामदेवांचा जन्म शके 1192 म्हणजे इ.स. 1270 ला झाला. नामदेवांचे घराणे व्यवसायाने शिंपी होते. नामदेवांचे कुटुंबीय पंढरपुरी आले की त्यांचे वास्तव्य पंढरपुरातच होत असे. याबद्दल अभ्यासकांत वेगवेगळी मते आहेत. एवढे खरे की नामदेवांना बालवयापासून विठ्ठलभक्तीचा ओढा व प्रेम होते. त्यांच्या उत्कट भक्तीची, निरागस प्रेमाची कथा प्रसिद्ध आहे. नामदेवांचा नैवेद्य, नामदेवांच्या प्रेमापुढे झुकून ईशशक्तीने प्रकट होऊन भक्षण केला. प्रसंगी मीरेचे विष घेतो, तो नामदेवांच्या भक्तीत दिसून येतो. इतके उत्कट प्रेम क्वचितच पाहायला मिळते. नामदेव पंढरपूर सोडून बाहेर जात नसत. पांडुरंगाच्या विरहाची कल्पना त्यांना सहन होत नसे, परंतु स्वयंभू सिद्ध पुरुष ज्ञानदेव आणि त्यांची भावंडे पंढरपुरात आली आणि पंढरीचे व विठ्ठलाचे भावविश्व बदलून गेले. नामदेव संख्यत्वाच्या नात्याने, प्रेमाने या भावंडांशी जोडले गेले. ज्ञानदेवांच्या विचाराने भारलेला संतमेळा पंढरपुरात जमा होऊ लागला. नामदेवांच्या सगुण भक्तीला ज्ञानदेवांच्या सहवासातून तत्त्वजिज्ञासेची जोड मिळू लागली. सर्वाभूती भगवद्भाव आणि समतेच्या विचाराने आत्मविकासाची विचारधारा ज्ञानेश्वरांच्या सहवासात सकस होऊ लागली. नामदेवांच्या वृत्तीत बदल होऊन प्रथमच संतमेळाव्याबरोबर तीर्थयात्रेसाठी पंढरपूर सोडून बाहेर निघाले. मुक्ताई नामदेवांना एकदा ‘निगुरा’ म्हणून संबोधते, त्याचा अर्थ तेलढोकीला आल्यावर गोरोबा काकांच्या परीक्षेत उलगडतो. संताच्या आत्मज्ञानाच्या परीक्षेत गोरोबाकाका नामदेवांचे मडके कच्चे ठरवतात. नामदेवांचा अहंभाव दुखावतो. त्यांना राग येतो. आध्यात्मिक जीवनात गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. नामदेवांना गुरूकृपेसाठी विसोबा खेचरांकडे पाठवले जाते. ओंढय़ा नागनाथाचे विसोबा खेचर हे नाथसंप्रदायी असून योगविद्येशी जोडलेले होते. योगमुद्रेतील खेचरमुद्रेस देह हलका होतो असे म्हणतात. संत नामदेव-विसोबा खेचरांना भेटले तेव्हा ते शिवपिंडीवर पाय ठेवून झोपलेले होते. ते पाहून नामदेवांना आश्चर्य आणि खंत वाटली, परंतु विसोबा खेचरांनी त्यांना हाक मारून सांगितले, ‘नाम्या, जेथे देव नाही तेथे माझे पाय ठेवतोस का? नामदेवांनी जिथे जिथे ‘त्यांच्या गुरूंचे पाय ठेवले तिथे तिथे शिवपिंड होती. ही गुरुदीक्षा होऊन विश्वात्मक ईश्वराचा साक्षात्कार नामदेवांना झाला, नामदेव आनंदाने म्हणतात, ‘डोळियाचे डोळे उघडीले जणे। आनंदाचे लेणे लेवविले।।’ औंढय़ा नागनाथाला आणखी एक अद्भूत आश्चर्य घडले. एकदा तिथे नामदेवांना अटकाव केला गेला तेव्हा मंदिराच्या पाठीमागे जाऊन त्यांनी कीर्तन सुरू केले तेव्हा मंदिराने दिशा बदलून ते नामदेवांना सन्मुख झाले. पूर्वाभिमुख असलेले मंदिर आजही त्या घटनेची साक्ष देत पश्चिमाभिमुख आहे.
तीर्थयात्रा संपवून सर्व संत परतल्यावर संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या फक्त 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. सारे शोकसागरात बुडाले. ज्ञानदेव, नामदेवांच्या समतेवर आधारित विश्वात्मक तत्त्वज्ञानाचे शिल्पकार होते. भागवत धर्माच्या प्रसाराची धुरा ज्ञानेशांनी नामदेवांकडे सोपवली. हे कार्य नामदेवांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर सुमारे 56 वर्षे केले. नामदेवांच्या अभंगसृष्टीत आणि कीर्तनाच्या सादरीकरणात आर्तक, उत्कटता भक्ती आणि माधुर्य या गुणविशेषांमुळे प्रचंड श्रोतृसमुदाय त्यांच्या भजनकीर्तनाच्या चाहता झाला. विठ्ठल मंदिराच्या पायरीवर त्यांचा प्रिय शिष्य चोखामोळा यांची समाधी आहे. त्या जवळच पायरीवर नामदेवांची समाधी आहे. ती नामदेवांची पायरी म्हणून ओळखली जाते. सर्व वारकरी या पायरीला नमस्कार करून मगच मंदिरात प्रवेश करतात. संतांच्या विचारधारेचे स्मरण व्हावे म्हणून आपण त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करतो, संतांच्या विचारात आपण कोठे उभे आहोत हे उमगते.



























































