
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या वाकडी गावात काही अज्ञात इसमांनी नवजात अर्भकाला गावातील सार्वजनिक विहिरीत फेकल्याची घटना 6 जुलै रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. नवजात अर्भक कोणाचे असेल अशी शंका गावकऱ्यांच्या मनात आहे.
दुपारच्या सुमारास गावातील लहान मुले रस्त्यावर खेळत असताना त्यांनी सार्वजनिक विहिरीच्या आतमध्ये डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांना विहिरीतील पाण्यामध्ये काहीतरी तरंगत असतांना दिसले. त्या क्षणी त्यांनी ही माहिती आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दिली. यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला.
त्यानंतर गावचे पोलीस पाटील यांनी या प्रकरणाबाबत कुरखेडा पोलीस विभागाला माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



























































