डॉक्टरांना स्टेथोस्कोपवरून आजार कसा समजतो? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्येत बरी नसली की आपण डॉक्टरकडे जातो. तिथे गेल्यावर डॉक्टर आपल्याला तपासतात आणि औषधोपचार करतात. शरीरात नेमका काय त्रास उद्भवला आहे, याचं निदान ज्या वैद्यकीय अवजारांच्या मदतीने केलं जातं, त्यातील एक महत्त्वाचं अवजार म्हणजे स्टेथोस्कोप.

डॉक्टरकडे गेल्यानंतर ते या स्टेथोस्कोपची इअरप्लग सारखी दिसणारी बाजू कानात घालतात आणि दुसरी चकतीसारखी बाजू रुग्णाच्या हृदयजवळ ठेवतात आणि काळजीपूर्वक तपासणी करतात. असं तपासल्यानंतर त्यांना रुग्णाच्या आजाराचं प्रमाण कळतं. पण या स्टेथोस्कोपवरून रुग्णाच्या आजाराविषयी त्यांना कळतं कसं? कोरा या संकेतस्थळावर त्याचं उत्तर देण्यात आलं आहे.

स्टेथोस्कोपने नेमकं काय तपासलं जातं?
सर्वप्रथम रुग्णाचा श्वास तपासला जातो. एक प्रौढ माणूस दर मिनिटाला 15 ते 20 वेळा श्वास घेतो. बाळ 40 वेळा श्वास घेतं. जर आजार असेल तर हे प्रमाण कमी किंवा जास्त होतं. फुफ्फुसांच्या आत नळ्या आणि कोशिका असतात, त्यातून हवा आत येते आणि बाहेर जाते. त्यावेळी वेगवेगळे आवाज येतात. फुफ्फुसाच्या आवरणाचाही आवाज येत असतो. कागद चुरगळल्यासारखा आवाज येणं, हलकासा संगीतमय आवाज येणं, असे आवाज ऐकू येतात. दमा, खोकला, क्षय अशा आजारांमध्ये या आवाजावरूनच अंदाज लावला जातो.

स्टेथोस्कोप कानाला लावून हृदयाची गती, ठोके आणि नाडी तपासली जाते. हृदयाची गती आणि नाडीत तफावत असेल तर तसं निदान करता येतं. हृदयातही झडपा असतात, त्याचाही आवाज ऐकू येतो. त्यावरून रुग्णाच्या आजाराचं निदान करता येतं.

रुग्णाचा रक्तदाबही काही डॉक्टर स्टेथोस्कोपच्या साहाय्याने ऐकून सांगू शकतात. आतड्यांचे किंवा पोटांचे विकारही स्टेथोस्कोप लावून कळतात. पोटातील अवयवांचेही विशिष्ट आवाज असतात. विकार झाल्यानंतर त्या आवाजांमध्ये फरक पडतो. आवाजांवरूनच रुग्णाच्या पोटाची स्थिती कळते.

अर्थात स्टेथोस्कोप हा प्राथमिक अंदाज असतो. त्यानुसार डॉक्टर पुढील उपाययोजना करतात. त्यात गोळ्या, औषधं, इंजेक्शन ते रुग्णालयात दाखल करण्यापर्यंतचे पर्याय ठरवता येता.