
‘हिरकणी’तील राज्याभिषेक असो, ‘फत्तेशिकस्त’चे ‘रणी फडकती’ गाणे असो, विविध पुरस्कार सोहळे अन् सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा ‘मराठी बाणा’… भव्यदिव्यता ही सुभाष नकाशे यांच्या नृत्यदिग्दर्शनातून नेहमीच पाहायला मिळते. शंभर-दोनशे फुटांचे स्टेज आणि हजारो डान्सर असे भव्यदिव्य नृत्यदिग्दर्शन करणारे सुभाष नकाशे आता नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोककलांवर आधारित कार्यक्रम रंगभूमीवर आणण्याच्या ते तयारीत आहेत.
समृद्ध लोककलांचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. लोककलांमधून त्या लोकसमूहाच्या रूढी-परंपरांचे दर्शन घडते. गोंधळ, जागरण, भारुड, कोळी नृत्य, जोगवा आदी लोककलांचे दर्शन या कार्यक्रमातून घडणार आहे. कार्यक्रमाबाबत बोलताना सुभाष नकाशे म्हणाले, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून नाटक, इव्हेंट बंद आहेत. कोरोनानंतर पुन्हा उभारी घेऊन रंगभूमीवर यायचं तर काहीतरी भव्यदिव्य असले पाहिजे, याच विचारातून महाराष्ट्रातील लोककलेला संपूर्णपणे वाहिलेला कार्यक्रम आणण्याची संकल्पना मला सुचली. मी यापूर्वी ‘मराठी बाणा’साठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. त्यापेक्षा थोडी वेगळी संकल्पना आणि मांडणी या कार्यक्रमाची असेल. सध्या या कार्यक्रमाच्या रूपरेषेवर काम सुरू आहे. ज्या संस्थेसोबत मी गेली 28 वर्षे काम करतोय त्यांच्यासोबत हा कार्यक्रम करण्याचा माझा मानस आहे.
फिरता रंगमंच, भव्यदिव्य सादरीकरण
पुढे ते म्हणाले, या कार्यक्रमासाठी फिरता रंगमंच असेल, कार्यक्रमादरम्यान तीन ते चार वेळा सेट बदलेल. 125 ते 150 कलाकार आणि लोककलावंत परफॉर्म करतील. आमचा परफॉर्मन्स फक्त स्टेजपुरता मर्यादित न ठेवता त्यात प्रेक्षकांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ, वारी नुसती प्रेक्षकांमधून चालत स्टेजवर येऊन या विंगेतून त्या विंगेत न जाता त्या वारीचा अनुभव प्रेक्षकांना घेता येईल. ‘न भूतो न भविष्यति’ असा अनुभव प्रेक्षकांना मिळेल. आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातल्याने आपली संस्कृती अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल तसेच पाश्चात्य नृत्यांकडे वळालेली आजची तरुणाई पुन्हा एकदा आपल्या लोककलांकडे वळेल, असा विश्वास नकाशे यांनी व्यक्त केला.





























































