
पतंजली कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने दोन भावडांना एजन्सी देण्याच्या नावाखाली तब्बल 5 लाख 70 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना 24 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2020 मध्ये बाणेरमध्ये घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या भावाला पतंजली कंपनीची एजन्सी घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार 24 ऑक्टोबर 2020 ला सायबर चोरट्याने तक्रारदार तरुणाला फोन करून पतंजली कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला पतंजली कंपनीची एजन्सी सुरू करायची असल्यास 1 लाख 20 हजार रूपये जमा करा, असे त्याने सांगितले. विश्वास संपादित करण्यासाठी सायबर चोरट्याने तक्रादाराच्या व्हॉट्स क्रमांकावर पतंजलीचे प्रमाणपत्र पाठविले. त्यानंतर विश्वास पटल्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या भावाने वेळोवेळी संबंधिताच्या बँक खात्यात ऑनलाईनरित्या 5 लाख 70 हजार रूपये जमा केले. मात्र, त्यानंतरही पतंजली कंपनीची एजन्सी न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.





























































