पुण्य़ात बेकायदेशीर ठेवलेल्या थिनरच्या साठ्याला आग, दोन जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पुण्यात शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका बस गॅरेजच्या शेजारी बेकायदा साठा करुन ठेवलेल्या थिनरच्या बॅरेलच्या साठ्याला भीषण आग लागली. या आगीत दोघे भाडेकरु जखमी झाले आहेत. आगीमध्ये शेडबाहेर उभ्या असलेल्या दोन अलिशान बसगाड्या जळून खाक झाल्या असून शेडमधील 15  ते 20 बॅरेल जळून गेले आहेत.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, कोपरे गावाजवळ एका बस गॅरेजच्या शेजारील शेडमध्ये थिनरचा बेकायदेशीरपणे मोठा साठा करुन ठेवण्यात आला होता. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास साठ्याला अचानक आग लागली. त्यामुळे त्याठिकाणी राहत असलेले दोघे भाडेकरु भाजले गेले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

थिनरचे 15  ते 20 बॅरेल एकमेकांना लागून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीचा भडका होऊन शेड बॅरलवर कोसळले. त्यानंतर नागरिकांनी अग्निशमक दलाला माहिती दिल्यानंतर सिंहगड रोडवरील अग्निशमन केंद्राची पहिली गाडी घटनास्थळी पोहचली. तोपर्यत आग शेजारील बस गॅरेजमध्ये पोहचल्याने  इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले. शेडच्या बाहेर उभ्या असलेल्या दोन लष्करी बसला झळ बसल्याने नुकसान झाले आहे.