
गेल्या आठवडय़ात कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे दोन दिवस बंद असलेली लसीकरण मोहीम सोमवार, 9 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला आज 44 हजार कोव्हिशिल्डचे डोस मिळाले आहे. त्यामुळे मुंबईत सोमवारी नियमितपणे सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू राहील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईसह देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडून पुरवण्यात येत असलेला मोफत लसींचा पुरवठा अपुऱया प्रमाणात येत असल्यामुळे आठवडय़ातील एक ते दोन दिवस लसीकरण बंद ठेवावे लागत आहे तर काही दिवस अर्धी केंद्रे बंद ठेवून लसीकरण केले जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेला आज 44 हजार डोस मिळाले असल्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या 314 केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली.

































































