
आषाढ महिन्यातील शेवटच्या दोन दिवशी (शनिवार, रविवार ) पुणेकरांनी 40 टन मासळी, 400 टन चिकन आणि 1200 बोकडांचे मटण फस्त करत गटारी अमावास्या साजरी केली. त्यामुळे चिकन, मटण, मासळी बाजारात मोठी उलाढाल झाली. सामिष खवय्यांकडून मासळी, चिकन, मटणाला मोठी मागणी राहिली.
सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात सामिष पदार्थांचे सेवन वर्ण्य मानले जाते. कित्येक जण तर दिवाळीपर्यंत मांसाहार करत नाहीत. त्यामुळे आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनचे आवर्जून सेवन केले जाते. त्यामुळे आषाढ महिन्यात अनेक जण सामिष पदार्थांचे भोजन करतात. यावर्षी शनिवारी आणि रविवारी दोन दिवस अमावास्या होती. त्यामुळे खवय्यांनी सकाळपासूनच मटण, चिकन आणि मासळीच्या दुकानात गर्दी केली होती. गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी म्हणाले,
आषाढाच्या पार्श्वभूमीवर आवक कमी पडल्याने दोन दिवसांत सुरमई, पापलेट, कोळंबी, बांगडा व बोंबीलच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. उर्वरित मासळींचे भावातही तुरळक वाढ झाली.
पुणे जिल्हा बॉयलर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी म्हणाले, यंदा आखाडात पक्ष्यांची आवक चांगली राहिली. त्यात गेल्या आठवड्यात अपेक्षेपेक्षा जास्त आवक झाल्याने चिकनच्या भावात घाऊक बाजारात किलोमागे 40 रुपयांची घसरण झाली, तर गावरान अंड्यांचे भाव शेकड्यामागे 50 ते 60 रुपये व इंग्लिशचे भाव 20 ते 30 रुपयांनी उतरले.
मटण दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, पूरस्थिती आणि तसेच कोरोनामुळे आखाड पार्ट्यांचे नियोजन न झाल्याने मटणाला मागणी कमी होती. तसेच कोरोनाकाळात रिकामा झालेला खिसा, त्यात 700 रुपये किलोपर्यंत पोहोचलेले मटणाचे दर यामुळे खवय्यांनी मटणाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.





























































