बीड जिल्ह्यावर डेल्टा व्हायरसची टांगती तलवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यामध्ये डेल्टा व्हायरसचा रूग्ण सापडल्याचे समोर आले आहे. मात्र हा रूग्ण मे महिन्यात कोरोनाबाधित झाला होता. त्यानंतर या रूग्णाचा मृत्युही झाला. एप्रिल आणि मे मध्ये दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा बीड जिल्ह्यामध्ये जो स्फोट झाला होता तो कदाचित डेल्टा व्हायरसमुळेच झाला असावा असा आरोग्य यंत्रणेचा अंदाज आहे. आयसीएमआरने काही दिवसांपूर्वी स्वॅबचे रँडम सॅम्पल तपासले त्यात डेल्टा व्हायरसचा हा रूग्ण उघडकीस आला आहे. आता बीड जिल्ह्याला अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे डेल्टा व्हायरसची भीती असताना दुसरीकडे दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. डेल्टा व्हायरसचे संकट दूर झाले आहे असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा का कमी होत नाही याचं रहस्य आता उलगडू लागले आहे. एप्रिल आणि मे मध्ये जी दुसरी लाट होती त्या लाटेत डेल्टा ओरिएन्टचे रूग्ण बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याची भीती आता व्यक्त होत आहे. म्हणूनच या लाटेचा संसर्ग झपाट्याने झाला आणि तो आजपर्यंत कायम आहे. मराठवाड्यात रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झालेली असताना बीड जिल्ह्यामध्ये मात्र कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात न येण्याचे कारणच ते आहे. बीड जिल्ह्यामध्ये डेल्टा व्हायरचा रूग्ण सापडल्याचे समोर आले आहे. तो रूग्ण बीड जिल्ह्यातील आहे. वय वर्ष 70 असणाऱ्या या रूग्णाला 4 जून रोजी कोरोनाची लागण झाली. या रूग्णाच्या स्वॅबचे सॅम्पल अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्या अहवालावरूनच कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. या रूग्णावर 14 दिवसांचे उपचार झाले. आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शुगर आणि किडणीचा आजार असल्याने काही दिवसानंतर या रूग्णाचा मृत्युही झाला.

ऑगस्ट महिन्यात आयसीएमआर यांनी बीड जिल्ह्यातील विशेषत: अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयामध्ये तपासण्यात आलेल्या स्वॅबचे रँडम सॅम्पल ताब्यात घेतले आणि तपासणीसाठी पाठवले. त्यात जून महिन्यामध्ये एका रूग्णाला डेल्टा व्हायरस झाल्याचे समोर आले आणि खळबळ उडाली. आरोग्य प्रशासनाच्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हायरसचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर होते म्हणूनच कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढला आणि मृत्युचा दर वाढत राहिला. कदाचित सध्याही डेल्टा व्हायरचे रूग्ण बीड जिल्ह्यामध्ये अजूनही असू शकतात असा त्यांचा तर्क आहे आणि त्या दृष्टीनेच आयसीएमआर पाऊले टाकत आहे.

आरोग्य प्रशासनाच्या मेहनतीचे फलित

एप्रिल, मे महिन्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट फोफावल्या गेली. त्या लाटेत डेल्टाचे अनेक रूग्ण बीड जिल्ह्यामध्ये असावेत आणि त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा स्फोट झाला असतानाही जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये रूग्णसंख्या दोनशेच्या आसपास असली तरी ती फार वाढलेली नाही. याला कारण आरोग्य प्रशासनाच्या परिश्रमामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वेळेवर झाली आणि बाधितांना उपचार मिळाले यामुळेच हा व्हेरियंट ऑगस्टमध्ये फारसे नुकसान करू शकला नाही.

म्हणूनच बीड जिल्ह्यात संसर्गाचा स्फोट – डॉ.अनिल बारकुल

मे महिन्यातील कोरोनाबाधित रूग्णाचे रँडम सॅम्पल तपासले असता त्यातील एक रूग्ण डेल्टा व्हायरसचा असल्याचे समोर आले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात बीड जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा अक्षरश: स्फोट झाला होता. या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हायरसचे अनेक रूग्ण त्यात असू शकतात अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. सध्याही ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात मास्क वापरला जात नाही, अंतर ठेवले जात नाही, याचा फटका जिल्ह्याला बसत आहे असे डॉ.अनिल बारकुल यांनी म्हटले आहे.