
तिसरी संभाव्य लाट आणि कोरोना लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांमधील अँटिबॉडीजचे प्रमाण पाहाण्यासाठी महापालिकेच्या 24 वॉर्डमधील पालिका दवाखान्यांमार्फत पाचवे सिरो सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. आज त्याची सुरुवात झाली.
कोरोना संसर्गाचा नेमका प्रवास कसा सुरू झाला आणि आता कसा सुरू आहे याची माहिती मिळवण्यासाठी सिरो सर्वेक्षण (रक्त नमुने संकलन करून सर्वेक्षण) महत्त्वाचे ठरत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत चार वेळा सिरो सर्वेक्षण पूर्ण केले असून आता पाचवे सिरो सर्वेक्षण आजपासून हाती घेतले आहे. यामध्ये एकूण 8 हजार नमुने संकलित करुन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. महानगरपालिकेच्या पुढाकाराने पहिले व दुसरे सर्वेक्षण जुलै व ऑगस्ट 2020 मध्ये तीन प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आले, तर तिसरे सर्वेक्षण मार्च 2021 मध्ये आणि चौथे सर्वेक्षण लहान मुलांकरीता मे ते जून 2021 या कालावधीत झाले.
शीव रुग्णालयात नमुने तपासणार
बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये निवडक वैद्यकीय व्यावसयिकांद्वारे (जनरल प्रॅक्टिशनर्स) त्यांच्या दवाखान्यात सर्वेक्षणाबाबतची कार्यवाही करण्यात येईल. या सर्वेक्षणात एकूण 8 हजार नमुने घेण्यात येणार असून त्यांची चाचणी शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वेपचार रुग्णालयात करण्यात येणार आहे. आयडीएफसी आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.






























































