
मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम पुन्हा तीव्र केली असून या मोहिमेअंतर्गत वर्सेवा गावठाणमधील चार मजली अनधिकृत इमारतीचे तोडकाम पालिकेच्या के-पश्चिम विभागाने सुरू केले आहे. के-पश्चिम विभागातील 65 अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्यात आली असून ही कारवाई महिनाभर सुरू राहणार आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी एकावर एक मजले बांधून अनधिकृत बांधकामे केली जातात. अशी बांधकामे पडली की, त्यात अनेकांचे हकनाक जीव जातात. त्याचबरोबर पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून डोंगराळ भागात असलेली अनधिकृत तसेच झोपडपट्टय़ांमधील कच्ची अनधिकृत बांधकामे वेळीच तोडण्यासाठी महापालिका विशेष कारवाई राबवत आहे. त्यानुसार के-पश्चिममधील 10 इमारतींसह एकूण 65 बांधकामांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व बांधकामांना नोटिस बजावण्यात आली असून त्यानंतरच ही कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई आता महिनाभर सुरू राहणार आहे, अशी माहिती के-पश्चिमचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी दिली.






















































