
पुण्यातील सिंहगड रस्ता भागातील पेट्रोल पंपावरील रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीची तीन रिव्हॉल्वर, पाच काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. किरण शिवाजी खवळे (वय 22, रा. भीमाई हाऊसिंग सोसायटी, निगडी), विल्यम जॉन पीटर (वय 22, रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता), वैभव राजू खिरीट (वय 24, रा. गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे), आकाश गोपीनाथ मते (वय 23, रा. वृंदावन गार्डन, कोल्हेवाडी, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींपैकी खवळे सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात पिंपरी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याान्वये (मोक्का) कारवाई केली होती. गेल्या आठ महिन्यांपासून खवळे फरार होता.
सिंहगड रस्ता परिसरात पेट्रोल पंपावरील रोकड लुटण्यासाठी चोरटे येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर आणि राजेंद्र मारणे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौघांना पकडले. अंधारांचा फायदा घेत चोरट्यांबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला. चोरट्यांकडून देशी बनावटीच्या तीन रिव्हॉल्वरसह पाच काडतुसे, तीन दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेतील युनिट तीनचे पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमृता चवरे, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, महेश निंबाळकर, विल्सन डिसोझा, दीपक क्षीरसागर आदींनी ही कारवाई केली.




























































