
अॅपल हा आपल्या खास आणि आकर्षक उत्पादनांसाठी ओळखला जातो. अॅपलचे विशेष कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कूक यांच्या कार्यकाळात कंपनीची चांगलीच वाढ झाली आहे. कोरोना काळात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अनेक देशांना आणि कंपन्यांना फटका बसला. मात्र, कोरोना काळात अॅपलने चांगली घोडदौड केली आहे. या काळात कंपनीचे सीईओ टिम कूक यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
टिम कूक यांचे कंपनसेशन पॅकेज 2020 या वर्षात 265 मिलियन डॉलर( सुमारे 19 अब्ज रुपये) होते. ब्लूमर्गने अॅन्युअल इंडेक्समध्ये याबाबतची माहिती दिली आहे. या माहितीनुसार टिम कूक यांना 10.7 मिलियन डॉलरचा बोनस मिळाला आहे. 3 मिलियन डॉलर वेतन जमा झाले आहे. तर 1 मिलियन डॉलर पर्क्स आणि सर्वाधिक म्हणजे 250.3 मिलियन डॉलर स्टॉक अवॉर्ड त्यांच्या खात्यात जमा झाले आहे. एवढी मालामाल करणारी कमाई कूक यांनी केली आहे. कूक यांचे पॅकेज या काळात दुपटीने वाढल्याचे आकडेवारीत म्हटले आहे.
2019 मध्ये कूक यांची कमाई 133.7 मिलियन डॉलर होती. ती 2020 मध्ये 265 मिलियन डॉलर झाली आहे. ते सर्वाधिक कमाई असलेले अमेरिकेतील आठव्या क्रमांकाचे सीईओ आहेत. कूक यांच्या पॅकेजमधून स्टॉक अवॉर्डची कमाई हटवल्यास त्यांची कमाई फक्त 14.7 मिलियन डॉलर एवढीच आहे. त्यांच्या कमाईत सर्वाधिक हिस्सा स्टॉक अवॉर्डचा आहे. या आकडेवारीनुसार त्यांच्या उत्पन्नात 28 टक्क्यांची वाढ झाली आहे.























































