लेख – राखेतून फुललेले नंदनवन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

‘फिनिक्स’ हा काल्पनिक पक्षी राखेतून पुनर्जन्म घेतो अशी पाश्चात्य कथा आहे. विपत्ती पचवून नव्या उमेदीने जीवनाची सुरुवात करणाऱयांना ‘फिनिक्स’ची उपमा दिली जाते. अशी नवी उभारी घेणाऱयांत व्यक्ती, समूह, राष्ट्र कोणीही असू शकते. अतिशय जिद्दीने राखेतून म्हणजे विनाशातून समृद्धीकडे जाणाऱयांची उदाहरणे इतिहास काळापासून आजपर्यंत अनेक आढळतील.

आज गोष्ट पुन्हा एकदा जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या जगप्रसिद्ध शहरांची. या नगरांना जी प्रसिद्धी लाभली ती त्यांच्यावर झालेल्या अमानुष आण्विक हल्ल्यामुळे. जगात आजवर दोन वेळाच ऍटमबॉम्बचा वापर झाला. तो अमेरिकेने जपानविरुद्ध केला. दुसऱया महायुद्धात जर्मनीच्या बाजूने उभ्या राहिलेल्या जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केल्यावर संतापलेले अध्यक्ष हॅरी टमन यांनी एक भयंकर निर्णय घेतला. अमेरिकेने नुकत्याच बनवलेल्या विध्वसंक अणुबॉम्बचा ‘प्रयोग’ त्यांनी जपानवर करायचे ठरवले आणि 6 ऑगस्ट 1945 रोजी ‘लिटिल बॉय’ या सांकेतिक नावाचा अणुबॉम्ब टाकण्यात आला. क्षणार्धात या बॉम्बने आपला प्रताप दाखवला. शहरातल्या सत्तर टक्के इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. ऐंशी हजार जीव प्राणाला मुकले आणि नंतर हजारो लोक या बॉम्बने निर्माण केलेल्या रेडिएशनला बळी पडले… आणि 1598 पासून जपानचे महत्त्वाचे शहर असलेले, तसेच 1894 ते 95 या काळात शिंटो राजांनी वर्षभर जपानची राजधानी केलेले महानगर होत्याचे नव्हते झाले.

तोपर्यंत जगाने असा उत्पात अनुभवला नव्हता. जपान शरण आला नाही तर अशा बॉम्बचा वर्षाव करू म्हणणाऱया टमन यांना तरी नेमक्या नरसंहाराची कल्पना होती की नाही कोण जाणे आणि असली तर परिणामांची भीषणता ठाऊक झाल्यावरही लगेच 9 ऑगस्टला अमेरिकेने ‘फॅट मॅन’ नावाचा बॉम्ब नागासाकी या जपानी शहरावर टाकून कहर केला. त्यात ताबडतोब पस्तीस हजारांना आणि नंतर अनेकांना प्राण गमवावे लागले. साऱया जगात अमेरिकेचा निषेध झाला. त्या देशातही त्याविरुद्ध आवाज उठला. आण्विक ‘चेन रिऍक्शन’चा शोध लावणारे अल्बर्ट आइन्स्टाइन व्यथित झाले. अवघे जग हादरले.

या उत्पातानंतर अमेरिका, ब्रिटन, रशिया या ‘दोस्त’राष्ट्रांच्या ज्या सैनिकांना जपानमध्ये जाण्याची संधी मिळाली त्यात ब्रिटिश-हिंदुस्थानी फौजेतले मेजर जनरल डिसूझा यांचाही समावेश होता. त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला होता. तेव्हा त्यांनी त्या वेळच्या विदारक स्थितीचे वर्णन केले होते. या नरसंहारावर नंतर माहितीपट, चित्रपटही निघाले. दोन विनाशकारी ऍटमबॉम्बचा तडाखा बसलेला जपान लगेच शरण आला आणि दुसरे महायुद्ध अणुबॉम्बच्या भीषण अंतिम हल्ल्यानंतर संपले. त्यानंतर जपानमधील राजेशाहीसुद्धा संपली आणि लोकशाहीची स्थापना झाली.

तिथल्या नव्या सरकारपुढे देशाची नव्याने उभारणी करण्याचे प्रचंड आव्हान होते. आता युद्ध परवडणार नाही हे लक्षात घेऊन केवळ पुनर्बांधणीच्या कार्यावर जपानने लक्ष केंद्रित केले. कारण राजेशाहीच्या काळात आधी अनेकदा चीनशी झालेल्या लढाया आणि शेवटी जागतिक महायुद्ध यामुळे जपान पुरता पोळला होता. बौद्ध तत्त्वज्ञानाचा स्वीकार करणाऱया जपानला आता समृद्ध शांततेकडे जायचे होते. सारा जपान मरगळ झटकून कामाला लागला आणि दशकभरातच त्याची चांगली फळे दिसू लागली. बेचिराख झालेल्या ‘फिनिक्स’ला पुन्हा जीवनाचे पंख फुटले होते.

गेल्या वर्षी जपानवरच्या अणुहल्ल्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली, तेव्हा आपण हिरोशिमा-नागासाकीच्या विध्वंसाचा आढावा घेतला होता. आता वर्षभराने याच शहरांची आज काय स्थिती आहे ते थोडक्यात पाहूया. हिरोशिमा या एकेकाळच्या जपानी लष्करी केंद्र असलेल्या शहराचा पूर्ण कायापालट झालेला आहे. हिरो म्हणजे ‘पसरट’ आणि शिमा म्हणजे ‘बेट’ असे तिथे जाऊन आलेले डॉ. अभय देशपांडे यांनी सांगितले. ते म्हणतात, ‘हिरोशिमाच्या विध्वंसाचे प्रतीक असलेला एक उद्ध्वस्त घुमट (डोम) तेवढा तसाच ठेवण्यात आला आहे. बाकीचे शहर हिरवेगार केले असून अनेक उद्योगांची नगरी बनले आहे. तिथली ‘ओकोनोमियाके’ हा स्वतःच्या हाताने बनवून खाण्याचा विशेष पदार्थ चाखायला पर्यटक येत असतात. त्याचा अर्थ तुमच्या आवडीचा पदार्थ. आज तिथे झालेल्या अणुहल्ल्याच्या खाणाखुणा जवळपास पुसल्या गेल्या आहेत. आपण एका समृद्ध, प्रगत शहरात वावरतोय असेच वाटते.

हिरोशिमाला जपानने 1949 मध्ये ‘शांततेचे शहर’ घोषित केले. 1955 मध्ये तिथे स्टीलचा ‘पीस पॅगोडा’ बांधण्यात आला. आज सुमारे 11 लाखांची लोकसंख्या असलेल्या औद्योगिक हिरोशिमाची आर्थिक उलाढाल सुमारे 60 अब्ज एवढी झाली आहे. नागासाकीनेही अशीच कात टाकलीय. जपानी नौदलाचे केंद्र होते म्हणून अमेरिकेने उद्ध्वस्त केलेल्या नागासाकीचे रूपांतरही निसर्गरम्य नगरात झाले असून चार लाखांच्या या शहरात वैज्ञानिक संशोधन जोमाने होत असते. साऱया जगासाठी हे प्रेरणादायी म्हणावे लागेल.