
मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात आला असून एप्रिल 2020 नंतर एकाच आठवडय़ात दुसऱयांदा दोनशेहून कमी म्हणजेच 190 दैनंदिन रुग्णनोंद झाली आहे. यामध्ये मृतांचा आकडाही कमी झाला असून गेल्या 24 तासांत 3 मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुंबईत 4 एप्रिल 2021 रोजी एकाच दिवसात सर्वाधिक 11 हजार 163 रुग्ण आढळले होते. तर 1 फेब्रुवारी रोजी 328 इतकी सर्वात कमी रुग्णनोंद झाली होती.
मुंबईत गेल्या वर्षी 11 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली. सुरुवातीच्या काळात शंभर-दोनशेच्या संख्येने आढळणाऱया रुग्णांची संख्या हजारोंवर गेल्याने मुंबईचे टेन्शन वाढले. जानेवारी 2021 अखेर पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर पुन्हा फेब्रुवारीच्या मध्यावर कोरोनाची दुसरी लाट आली. यावेळी फेब्रुवारीत 328 पर्यंत खाली आलेल्या रुग्णसंख्येने थेट दहा हजारांचा टप्पा गाठून 11 हजार दैनंदिन रुग्ण नोंदवले. मात्र पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजना आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सद्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या चांगलीच घटली आहे. एप्रिल 2020 नंतर गेल्या एकाच महिन्यात चौथ्यांदा 200 हून कमी रुग्ण नोंदवले गेले आहेत. मुंबईत 1 मे 2021 रोजी एकाच दिवसात 90 कोरोना मृत्यू नोंदवले गेले होते.
अशी सुधारली कोरोना स्थिती
- मुंबईत सद्यस्थितीत 2749 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.
- मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के आहे.
- रुग्ण दुपटीचा कालावधी 1966 दिवसांवर पोहोचला आहे.
- रुग्णवाढीची टक्केवारी 0.04 इतकी आहे.
- गेल्या 24 तासांत 271 जणांची कोरोनावर मात.
- एकाच दिवसात 26 हजार 484 चाचण्या, 190 बाधित.































































