घरातून पळून आलेल्या 477 मुलांना आरपीएफने पालकांकडे सुपूर्द केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरातून भांडून किंवा अन्य कारणांनी घर सोडून पळून आलेल्या 477 मुलांना मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने गेल्या सात महिन्यांत त्यांच्या पालकांच्या सुपूर्द केले आहे. यात 310 मुले तर 167 मुलींचा समावेश आहे. चाईल्ड हेल्पलाईन किंवा अन्य एनजीओच्या मदतीने आरपीएफने ही कामगिरी बजावली आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या खास प्रशिक्षित कर्मचाऱयांना ही मुले कधी ट्रेनमध्ये तर कधी प्लॅटफॉर्मवर निराधार एकटीच फिरताना आढळली होती. त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांच्या पालकांची माहिती काढीत ही अवघड जबाबदारी आरपीएफने पार पाडल्याने पालकांनी आरपीएफचे आभार मानले आहेत.

घरातून पळून आलेल्या मुलांचा विश्वास जिंकत त्यांना त्यांच्या पालकांकडे पुन्हा जाण्यासाठी त्यांचे मन वळविण्याची सामाजिक जबाबदारी आरपीएफने नेहमीच पार पाडली असल्याची प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली आहे. आरपीएफ तसेच प्रंटलाईन स्टाफने अशा नाजूक प्रकरणात दाखविलेल्या प्रसंगावधानाचेही त्यांनी कौतूक केले आहे.

जुलै महिन्यात सर्वाधिक 73 मुलांची सुटका
मध्य रेल्वेवर जानेवारी ते जुलै 2021पर्यंत एकूण 477 मुलांची सुटका करीत त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यात मुंबई डिव्हिजनमधून 166 मुलांची (104 मुले तर 62 मुली) सुटका केली आहे. तर पुणे डिव्हिजन 171 मुले (130 मुले तर 41 मुली ), नागपूर डिव्हिजन 40 मुले (22 मुले तर 18 मुली ) भुसावळ डिव्हिजनमधून 70 मुले (39 मुले तर 31 मुली ), सोलापूर डिव्हिजन 30 मुले (15 मुले तर 15 मुली) अशी प्रत्येक डिव्हिजननुसार कामगिरी केली आहे. एकटय़ा जुलै 2021मध्ये मध्य रेल्वेने 73 मुलांची सुटका करण्यात आली असून त्यात 47 मुलगे तर 26 मुलींचा समावेश आहे.

अभिनयात करीयर करण्यासाठी घर सोडले
24 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता डय़ुटीवर तैनात असलेल्या तिकीट तपासनीस नरेंद्र मिश्रा यांना कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान ट्रेन क्र. 03201मध्ये एकाटय़ाने प्रवास करणारी एक 17 वर्षीय मुलगी दिसली. एलटीटीला उतरल्यावर त्यांनी तिला आरपीएफची महिला स्टाफ बी. पाटीदार आणि चाईल्ड हेल्पलाईनच्या शारदा कांबळे यांच्याकडे सुपूर्द केले. ही मुलगी बिहारच्या पाटणा येथील असून घरी कोणालाही न सांगता मुंबईत अभिनय क्षेत्रात करीयर करण्यासाठी घरातून ती पळून आली होती.