
>> मिलिंद गोखले
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत घरोघरी पोहोचविण्याचा ध्यास घेतलेले आणि त्यासाठी आपले आयुष्य पणाला लावणारे ऋषितुल्य पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा आज 90 वा स्मृतिदिन. यानिमित्ताने…
आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत केवळ हिंदुस्थानातच नाही तर जगभर शिकलं, अभ्यासलं जात आहे. शंभर वर्षांपूर्वी ती केवळ मूठभर अभिजनांची मिरासदारी होती. राजदरबार आणि संस्थानिकांच्या महालातच शास्त्रीय संगीताचे सूर निनादत असत. याचं सगळं श्रेय जातं पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांना. पंडितजींनी 1901 मध्ये लाहोरला गांधर्व महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा त्यांच्यावर टीका केली गेली की, संगीताच्या अशा शाळा काढून कुठे तानसेन तयार होतात का? पंडितजींचे त्यावर असे उत्तर असे की, तानसेन तयार झाले नाहीत तरी ‘कानसेन’ नक्कीच तयार होतील. आज त्यांच्या या वक्तव्याची प्रचीती पदोपदी येते.
17 ऑगस्ट 1872 मध्ये सांगली जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ आडनाव गाडगीळ, पण त्यांच्या पलूस या गावावरून त्यांना पलुस्कर या आडनावाने लोक ओळखू लागले. पंडितजींचे घराणे कीर्तनकारांचे. त्यामुळे गाण्याचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यावर झाले होते. त्यांची कुशाग्र बुद्धी व मेहनत वृत्ती पाहून ते शिक्षणात खूप प्रगती होणार असे वाटत असतानाच एक दुर्घटना घडली. दत्त जयंतीच्या कार्यक्रमात फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये पंडितजींच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाली व नंतर उपचार करूनदेखील दृष्टी अधू राहिली. पुढे त्यांना पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांच्याकडे बारा वर्षे गायनाची तालीम देण्यात आली. नंतर 1986 मध्ये गायकीवर पूर्ण प्राविण्य मिळाल्यावर मिरज सोडून बडोदा, औंध, सातारा अशा राजाश्रय असलेल्या ठिकाणी जाऊन पंडितजींनी आपले कार्यक्रम केले व आपले संगीतावरचे प्रभुत्व सिद्ध केले. त्यांच्या हिंदुस्थान भ्रमंतीमध्ये त्यांचे असे निदर्शनास आले की, कलाकारांची कला असामान्य असूनदेखील त्यांना मानहानीची वागणूक दिली जाते. समाजात मान्यता मिळण्यासाठी कलाकारांना त्यांची वर्तणूक सद्वर्तनी व सदाचारी ठेवून स्वच्छंदी वृत्ती सोडावी यासाठी ते आग्रही राहिले.
गांधर्व महाविद्यालय व पलुसकर हे एक समीकरणच तयार झाले आणि त्यातूनच अनेक उत्तमोत्तम शिष्य तयार झाले. त्यातील काही म्हणजे पंडित ओंकारनाथ ठाकूर, पंडित विनायकराव पटवर्धन, पंडित शंकरराव व्यास, प्राध्यापक बी. आर. देवधर, पं. ना. भो. खरे, पं. वामनराव पाध्ये, पंडित बाबूराव गोखले तसेच शंकरराव पाठक, धोंडीराज पळूसकर, रघुनाथराव पटवर्धन आदी कलाकार तयार झाले. शिक्षणाबरोबरच वाद्य दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी वर्कशॉप निर्माण केले व तेथे शिष्यांना प्रशिक्षण दिले जाई. पाश्चात्य संगीत पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आपल्या शिष्यांना उद्युक्त केले. ना. मो. खरे यांनी पंडितजींच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले.
पंडितजींचे ध्येय नक्की असल्यामुळे राजवाडय़ांमधून बंदिस्त असलेले अभिजात शास्त्र्ााrय संगीत सर्वसामान्यांपर्यंत आणले. तसेच गांधर्व महाविद्यालय लोकांच्या आर्थिक पाठबळावर उभे केले व खऱया अर्थाने संगीत शिक्षणाची गंगा सर्वदूर पसरवून एका भगीरथाचे महान कार्य केले. गांधर्व महाविद्यालयाची लाहोर येथील 1901 मध्ये रोवलेली मुहूर्तमेढ, त्यांनी गायलेले ‘रघुपती राघव राजाराम…’ तसेच संगीत बाल प्रकाश या व्हॉल्युमची निर्मिती व पंडित पलुसकर लिपी हे त्यांचे संगीत क्षेत्रातील मोलाचे योगदान.
सर्व शिष्यांवर त्यांचे पुत्रवत प्रेम होते तसेच त्यांची गुरू भक्तीदेखील अलौकिक होती. खूप प्रसिद्धी मिळाल्यावरदेखील त्यांनी गुरुवर्य बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांची त्यांच्या वृद्धापकाळात शेवटपर्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांनी तयार केलेले शिष्य व त्यांचे पुत्र दिगंबर विष्णू पलुसकर हेदेखील चांगले नावारूपाला आले. गांधर्व महाविद्यालयाचा आता वटवृक्ष उत्तरोत्तर वाढत होता. याच वेळी आध्यात्मिक भक्तीने प्रेरित होऊन त्यांनी मुंबई सोडून पंचवटीस ‘रामनाम आधार आश्रम’ स्थापन केला व तेथेच त्यांनी ईशचिंतनाचे अखेरचे क्षण घालवले.
इंडिया टुडे ने मध्ये ‘100 people who shaped India’ मध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा समावेश केला आहे.
पंडितजींनी आपले सर्व शिष्यांना इतके चांगले प्रशिक्षण दिले की, गांधर्व महाविद्यालयाचा विस्तार सर्वदूर होऊन आज देशभरात 1200 च्यावर विद्यालयांमध्ये शास्त्र्ाशुद्ध गायन-वादन व नृत्याचे धडे देणारी गांधर्व महाविद्यालय ही एकमेव संस्था आहे.
(लेखक शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आहेत.)




























































