पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या सैन्याच्या विजयोत्सवी मशालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने 1971मधील पाकिस्तानविरोधातील युद्धात मिळविलेल्या विजयानिमित्त काढण्यात आलेल्या स्वर्णिम मशालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करणार आहेत. स्वर्णिम विजय वर्षानिमित्त आयोजित परिक्रमेतील या मशालीचे येत्या 1 सप्टेंबर 2021 रोजी मुंबईत गेट-वे ऑफ इंडिया येथे सैन्याच्या तिन्ही दलांच्या वतीने स्वागत करण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

हिंदुस्थानने पाकिस्तानला 1971च्या युद्धात नमवले होते. या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त देशभर ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त स्वर्णिम विजय मशालीची देशभर परिक्रमा सुरू आहे. या स्वर्णिम विजय वर्ष मशालीचे येत्या 1 सप्टेंबर 2021 रोजी मुंबईत आगमन होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सशस्त्र दलाच्या वतीने आज वर्षा या शासकीय निवासस्थानी निमंत्रण देण्यात आले. त्यासाठी हिंदुस्थानी नौदलाच्या वेस्टर्न कमांडचे व्हाईस ऍडमिरल आर. हरी कुमार यांनी तसेच हिंदुस्थानी लष्कराचे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवाचे जनरल कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल एस.के. पराशर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन या स्वर्णिम विजय वर्ष मशाल कार्यक्रमाची माहिती दिली. या वेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह तसेच प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.