क्रिकेट स्पर्धेत उतरला तालिबान संघ, वादाला तोंड फुटल्यावर संघ बाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकिकडे तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आहे, तेथील नागरिकांवर ते अत्याचार करत आहेत. तर दुसरीकडे एका क्रिकेट स्पर्धेत तालिबान संघावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

ही क्रिकेट स्पर्धा राजस्थान येथे आयोजित करण्यात आली होती. अणुचाचणीसाठी प्रसिद्ध असलेल्या पोखरण या शहरापासून जवळपास 36 किमी दूर असलेल्या जैसलमेर जिल्ह्यातल्या भनियाना या गावात ही स्पर्धा भरवण्यात आली होती.

या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत वेगवेगळ्या क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील एका संघाचं नाव तालिबान असं होतं. पोखरण फायरिंग रेंजच्या परिसरात ही स्पर्धा भरवण्यात आली होती. त्यामुळे हा भाग संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तालिबान या संघाचं नाव ऐकताच तिथे अनेकांनी आक्षेप घेतला.

अखेर या स्पर्धेचा पहिला सामना खेळवल्यानंतर आयोजकांनी या संघाला स्पर्धेतून बाद ठरवलं. या स्पर्धेचे आयोजक इस्माईल खान यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिलं. तालिबान असं नाव असलेल्या संघाला चुकून सहभागी करण्यात आलं होतं. पण, आता स्पर्धेतून त्याला बाद करण्यात आलं आहे आणि त्या संघावर संपूर्णतः बंदी घालण्यात आली आहे, असं खान यांनी म्हटलं आहे.

ऑनलाईन स्कोअरिंगमुळे हा प्रकार उघड झाला. या बाबत आयोजक म्हणून आम्ही दिलगीरी व्यक्त करत असून यापुढे त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊ, असं आश्वासनही खान यांनी दिलं आहे.