
>> सुनील कुवरे
पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा निसर्ग परिसर. निसर्ग, हवा, पाणी, सजीव-निर्जीव गोष्टी. आकाश जंगल, वृक्ष आदी गोष्टी म्हणजे पर्यावरण. निसर्गातील या सर्व गोष्टी मानवजातीला प्रसन्न करून टाकणाऱया आहेत. परंतु आज मानवाची जसजशी प्रगती होत गेली तसतशा मानवाच्या गरजा वाढू लागल्या. पूर्वीपासून असणाऱया निसर्गाचे चक्र बदलले आणि पर्यावरणाचा धोका निर्माण झाला. ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला जाणवू लागले. शेती उत्पादन, जलपुरवठा यांना फटका बसतोच, शिवाय मानवाच्या जीवनात अनेक बाधा निर्माण होतात. जैविक साखळी तसेच प्राण्यांच्या प्रजाती यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. कारण प्रदूषणाचा भस्मासुर वाढत चालला आहे. वाढत्या शहरीकरणाचा आणि औद्योगिकीकरणाचा सर्वाधिक परिणाम मानवावर होत आहे. तसेच निसर्गाची हानीदेखील मोठय़ा प्रमाणावर होत आहे. प्रदूषणाची ही समस्या दिवसेंदिवस भयंकर स्वरूप धारण करीत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडत चालला आहे. हे सर्व माहीत असूनही आज मानव जाणूनबुजून निसर्गाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीचा विनाश होण्याची वेळ आली आहे. तरी सर्वसामान्य नागरिक निसर्गाची काळजी घेत नाही. हे मोठे दुर्दैव आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.
आज आपण ‘झाडे लावा, झाडे जगवा’, पर्यावरण वाचवा अशा घोषणा देतो. वृक्ष दिंडय़ा काढल्या जातात. ग्लोबल वॉर्मिंगचे आकडे घेऊन शास्त्रज्ञ सावधानतेचा इशारा देतात. पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही. सरकारसुद्धा वनीकरण करण्याच्या घोषणा करते. सरकारही दरवर्षी झाडे लावते. 2019 पर्यंत 50 हजार कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते. पण किती झाडे लावली, किती झाडे जगली याकडे कोणी लक्ष देत नाही. खरे तर वातावरण चांगले शुद्ध करण्यासाठी झाडे मदत करतात.
झाडे लावण्याबरोबरच त्या झाडांची निगा, देखभाल करण्याचे दायित्व हे सर्वांचे आहे. तसेच आपल्या हिंदू धर्मात विविध तत्त्वांची पूजा केल्याचे सांगितले जाते. त्यात तुळस, वड, पिंपळ या झाडांची पूजा केली जाते. परंतु आजच्या या एकविसाव्या शतकात जंगले नष्ट होताना दिसतात. याला प्रमुख कारण मानव आहे.
तसेच अलीकडे वापरात येणाऱया प्लॅस्टिकमुळे या संपूर्ण विश्वाला धोका निर्माण झाला आहे. आपल्याकडे कायम प्लॅस्टिकच्या बाबतीत त्याचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो. महाराष्ट्रात प्लॅस्टिकवर बंदी घातली होती. परंतु आता पुन्हा सर्रास वापर होत आहे.
प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्या कित्येक वर्षांपर्यंत मातीमध्ये न मिसळता तशाच पडून राहतात. तेव्हा प्लॅस्टिकचा हा कचरा वृक्षांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील मातीचे आवरण, जमिनीची धूप होत जाते. हे नष्ट करण्यास एकप्रकारे मानवच कारणीभूत आहे.
हवामान बदल रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत; परंतु ही केवळ सरकारची जबाबदारी नाही.पर्यावरण जागरुकतेबाबत आपल्या सर्वांची वैयक्तिक पातळीवर भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
कार्बन उत्सर्जन कमी करण्यात झाडे आणि जंगलाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी आज गरज आहे ती जंगल वाचविण्याची. आज मानवाने स्वतःच्या गरजेपोटी जंगले तोडली. खरेतर सध्या सुरू असलेली वृक्षतोड थांबविणे आणि जंगलाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
आपला देश सर्व क्षेत्रात प्रगती पथावर असताना पर्यावरणाकडे डोळेझाक करून चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो, हे आपल्याला त्सुनामी, वादळे, भूकंप, अवकाळी पाऊस अशा अनेक नैसर्गिक प्रकोपांद्वारे जाणवले आहे. तसेच समाजाच्या सर्वच क्षेत्रात आज शुद्ध पर्यावरणाची निकड भासत आहे.परंतु पर्यावरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे. पृथ्वीने आणि निसर्गाने दिलेली सर्वच प्रकारची देणगी जतन करणे महत्त्वाचे आहे. पर्यावरण वाचले तर मानवाचे जीवनमान सुधारेल. तेव्हा पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. पर्यावरण जपणे ही जनतेचीही तेवढीच जबाबदारी आहे. तेव्हा सरकार काम करेल, अशी आशा न बाळगता सर्वसामान्यांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी पर्यावरणीय प्रदूषण टाळण्यासाठी जसे हवा प्रदूषण, जलप्रदूषण यावर प्रभावीपणे नियंत्रण आणणे. तसेच व्यापक स्तरावर पर्यावरण जनजागृती व्हावी यासाठी प्रोत्साहन देणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण समस्यांची समाजात जागृती निर्माण करण्याची गरज आहे. आपण सर्वांनी हे लक्षात घेऊन आपापल्या समाजाप्रमाणे पर्यावरण वाचविण्याचे ठरविले तरीही हळूहळू हे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. कारण पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. याचा विचार आता प्रत्येकाने करायला हवा.





























































