
महावितरणने आता सौर ऊर्जेबरोबरच पवन ऊर्जेच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. नॉन सोलर आरपीओ म्हणजे सौर ऊर्जेशिवाय इतर अपारंपरिक ऊर्जा वापराचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महावितरणने तब्बल 800 मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या प्रतियुनिट विजेचा दर जास्तीत जास्त 2 रुपये 65 पैसे एवढा असावा असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.
वीज वितरण कंपन्यांनी आपल्या एकूण वीज वितरणाच्या 14 टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पातून घ्यावी असे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार जवळपास 11 टक्के वीज सौर ऊर्जा प्रकल्पातून तर 3 टक्के वीज पवन ऊर्जा प्रकल्पातून खरेदी करणे आवश्यक आहे. महावितरण जास्तीत जास्त वीज सौर ऊर्जा प्रकल्पातून खरेदी करत आहे. त्याची दखल घेत वीज आयोगाने नॉन सोलर आरपीओ पूर्ण करण्यासाठी पवन ऊर्जा प्रकल्पातून वीज खरेदी करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत. त्यानुसार महावितरणने 500 मेगावॅट वीज राज्यातील पवन ऊर्जा प्रकल्पातून तर 300 मेगावॅट वीज ग्रीडमधून खरेदी करण्यासाठी 20 सप्टेंबरपर्यंत निविदा मागवल्या आहेत.
सौर ऊर्जेपेक्षा जादा वीज दर
महावितरणने पवन ऊर्जा प्रकल्पातून घेतल्या जाणाऱया प्रतियुनिट विजेला 2 रुपये 65 पैसे दर निश्चित केला आहे. तो सौर ऊर्जेच्या वीज दरापेक्षा जास्त आहे. महावितरणने सौर ऊर्जेच्या खरेदीसाठी नुकत्याच निविदा मागवल्या होत्या. त्यामध्ये 2 रुपये 42 पैसे एवढय़ा कमी दराने वीज पुरवण्याची तयारी अनेक वीज कंपन्यांनी दाखवली आहे.




























































