कोरोना रुग्णांसाठी 1200 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर घेणार, ‘आणीबाणी’ टाळण्यासाठी पालिकेचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत प्राणवायूअभावी सुदैवाने दुर्घटना घडली नसली तरी काही वेळा आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिका ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी 10 लिटर क्षमतेचे 1200 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर घेणार आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दुसऱया लाटेत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी घटण्याचे प्रकार वाढले होते. मुंबईची रोजची ऑक्सिजनची गरज 235 मेट्रिक टन आहे. मात्र अचानक मोठय़ा प्रमाणात प्राणवायूची मागणी वाढल्याने काही वेळा आणीबाणीची स्थिती निर्माण झाली. यामध्ये पालिकेच्या सतर्कतेमुळे 176 रुग्णांना वेळेत आणि सुरक्षितरीत्या हलवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, जम्बो सिंलिंडर्ससह कोणत्याही प्रकारची आणीबाणी निर्माण होऊ नये यासाठी 1200 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर घेण्यात येत आहेत. यातील 300 मशिन्स पालिकेने याआधी ताब्यात घेतल्या आहेत. तर उर्वरित 900 कॉन्सेंट्रेटर श्रद्धा डिस्ट्रिब्युटरकडून ताब्यात घेतले जाणार आहेत. या प्रत्येक मशीनसाठी सुमारे 85 हजारांचा खर्च करण्यात येणार आहे. याबाबतच प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

कोरोनाच्या दुसऱया लाटेत वाढणाऱया रुग्णसंख्येबरोबर ऑक्सिजनची मागणीही वाढल्याने पालिकेने ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. पालिका जम्बो कोविड सेंटर, प्रमुख रुग्णालयांच्या ठिकाणी 16 ठिकाणी हवेतून ऑक्सिजननिर्मिती करीत आहे.

याशिवाय पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक याप्रमाणे 40 मेट्रिक टन क्षमतेची 2 द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू साठाकेंद्रे उभारण्यात येत आहेत. तर मुंबई शहरात जम्बो आणि डय़ुरा सिलिंडर्स भरण्यासाठी रिफिलिंग स्टेशनही उभारत आहे.

विशेष म्हणजे ऑक्सिजन आणीबाणी निर्माण झाल्यास एका कॉलवर अर्ध्या तासात 25 जम्बो सिलिंडर्स पोहोचवून प्राणवायू पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहा वाहनेही तैनात ठेवण्यात आली आहेत.