बेस्टच्या नव्या वेळापत्रकामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ, बस थांब्यांवर माहिती देण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमाने 1 सप्टेंबरपासून आपल्या वेळापत्रकात अनेक बदल केले आहेत. अनेक लांबचे मार्ग बंद केले आहेत, तर 15 नवे मार्ग सुरू केले असून सहा मार्गांचा विस्तार केला आहे. तसेच 27 कॉरीडॉर मार्ग जाहीर करण्यात आले असून त्यावर दर 10 ते 15 मिनिटांनी फेऱया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या मार्गबदलांची प्रवाशांना कल्पना नसल्याने अनेक बस थांब्यांवर गेले दोन दिवस गोंधळाचे वातावरण आहे.

गेल्या दोन दिवसांपासून बेस्टचे वेळापत्रक बदलल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. बस थांब्यांवर तासन्तास बसची वाट पाहूनदेखील बस येत नसल्याने वैतागलेल्या प्रवाशांना टॅक्सीसह अन्य वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने बस मार्गात बदल केल्याची माहिती बस थांब्यांवर देण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. मार्ग क्र. 7 आणि 22 मर्यादित हे जे.जे. पुलाखालून जाणारे मार्ग बंद केल्याने येथून कुर्ला, विक्रोळी आणि मरोळ येथे जाणाऱयांना अन्य पर्याय नाहीत. दक्षिण मुंबईतील बस मार्ग क्र. 83 व 84वरील बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. बस मार्ग क्र. 66वरील बसच्या मार्गात बदल केल्याने प्रवाशांना मधल्याच थांब्यावर उतरून पायी चालत जावे लागत आहे. बेस्टची सेवा एकूण 484 बस मार्गांवर होत होती. त्यात कपात करून आता 419 बस मार्ग चालविण्यात येत आहेत. बेस्टने जादा प्रवाशी मिळण्यासाठी नव्या वेळापत्रकात रेल्वे स्थानक ते कार्यालय किंवा घर असे ‘फिडर रूट’ चालविण्यावर भर दिला आहे. मात्र लांबपल्ल्यांच्या मार्गांवरील काही बस बंद केल्याने प्रवाशांची अडचण झाली आहे.