चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची नाही; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी आरटीपीसीआर करणे सक्तीचे नसून केवळ खबरदारी म्हणून चाकरमानी अॅण्टीजेन टेस्ट करु शकतात. आरटीपीसीआर केली नाही म्हणून चाकरमान्यांना गावात कोणी अडवणार नाही असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा. कोरोनाचे नियम पाळा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला काढलेल्या आदेशामुळे चाकरमान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सुरुवातीला दोन डोस घेतलेल्यांना आणि 72 तासांपुर्वी आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार होता. अन्य मंडळींना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार होती. मात्र त्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, माझे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. चाकरमान्यांना कोणतीही आरटीपीसीआरसाठी सक्ती केली जाणार नाही. खबरदारी म्हणून चाकरमान्यांनी अॅण्टीजेन चाचणी करावी. गावात त्यांना कोणीही अडवणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.