
दक्षिणेकडील वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून या वातावरणामुळे मच्छिमारी व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. वाऱ्याचा वेग कमी झाल्यावर समुद्रातील मासेमारी पुन्हा सुरू होण्याची शक्यता मच्छिमारांनी व्यक्त केली आहे. मात्र, सध्या समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण वाऱ्यामुळे सध्या समुद्र खवळला असून खराब वातावरणामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका बंदरात परतल्या आहेत.
समुद्रातील वातावरणात वारंवार होत असलेल्या बदलाचा मच्छीमारीवर परिणाम होत असून या वातावरणामुळे समुद्रात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नौका मच्छीमारीसाठी न पाठविता बंदरात उभ्या करून ठेवाव्या लागत आहेत. खाडीमध्ये पारंपारिक मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने हा व्यवसाय संकटात आहे. तर खाडीत मिळणारे मुळे, तिसरे यांचेही प्रमाण कमी झाल्याने मच्छीमाराला पूरक असणारे हे छोटे व्यवसाय सध्या बंद आहेत.
समुद्रामध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने दक्षिण वारे वाहत असल्यामुळे समुद्र खवळला असून गुजरात,मालवण आदी भागातील नौका सुरक्षेच्या दृष्टिकोनाने देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. अद्याप मासेमारी सुरू झाली नसल्याने मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत.




























































