आता सीएम नाही तर पीएम बदलण्याची गरज! काँग्रेसची भाजपवर बोचरी टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱया वरिष्ठ नेत्यांचे राजकीय अपयश झाकण्यासाठीच भाजपची सत्ता असलेल्या सहा राज्यांमध्ये पाच मुख्यमंत्री बदलण्यात आले. मात्र सीएम बदलून या चुका सुधारता येणार नाहीत तर आता पीएम बदलण्याची वेळ आली आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी राजीनामा दिला. दुसऱयाच दिवशी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवण्यात आले. मात्र अशा प्रकारच्या घडामोडी गेल्या सहा महिन्यांत घडल्या असून त्यातून भाजपच्या पाच मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. यावरून केंद्रात सत्तेत असणाऱया भाजप सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कॉग्रसने जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने ट्विटरवर #CM_नहीं_PM_बदलो ही मोहीम सुरू केली आहे. भाजप सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी होत आहे. भाजपने संपूर्ण देशालाच अपयशी ठरवले आहे. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, असा टोला काँग्रेसने लगावला.

श्रेय स्वतःला, दोष दुसऱयाला 

कोरोना काळात हिंदुस्थानींचे आधी लसीकरण करून घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करणे हा सर्वात खात्रीशीर उपाय होता. मोदी सरकारला ही साधी गोष्ट का समजली नाही? मोदी सरकार आपले अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार? श्रेय स्वतःला घ्यायचे आणि दोष दुसऱयाला द्यायचा हाच मोदींचा मंत्र असल्याचे अन्य एका ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटले आहे.