पारनेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव येथे ‘संजय गांधी निराधार योजने’च्या तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे. देवरे यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱयांच्या त्रासामुळे मला आत्महत्या करावीशी वाटते, अशी व्हिडीओ क्लिप व्हायरल केली होती. त्यानंतर त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. त्या घटनेची महिला आयोगामार्फत त्रिसदस्यीय समितीने चौकशीही केली. शेवटी देवरे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.

देवरे पारनेरला हजर झाल्यापासूनच अनेकदा वादग्रस्त ठरल्या होत्या. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात त्या हजर झाल्या होत्या. त्याच वेळी त्यांनी केलेल्या विविध कारवायांच्या वेळीही त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. मात्र, त्यांनी कोरोनाकाळात चांगले काम केले. त्या काळात त्यांनी जनजागृतीसाठी केलेले व्हिडीओ गाजले होते.