बीकेसीत उड्डाणपुलाचा गर्डर कोसळून 14 कामगार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे-कुर्ला संकुल येथे एमएमआरडीए बांधत असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड उड्डाणपुलाचा गर्डर आज पहाटे साडेचार वाजता कोसळला. या दुर्घटनेत 14 कामगार जखमी झाले. जखमींवर येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यातील 13 जणांना घरी सोडण्यात आले तर एकावर उपचार सुरू आहेत.

एमटीएनएल जंक्शन येथे सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड उड्डाणपुलाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू आहे. या पुलाचा गर्डर पहाटे मोठा आवाज होत अचानकपणे कोसळला. यावेळी पुलाचे बांधकाम करणारे 14 कामगार जखमी झाल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेला जबाबदार नक्की कोण आहे, याच्या चौकशीचे आदेश एमएमआरडीएने दिले आहेत.

चौकशीचे आदेश
बीकेसीत गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएमार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच जखमी कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या 13 कामगारांना उपचार करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर एका जखमी कामगारावर उपचार सुरू असून शिंदे यांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयात जाऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.