नक्षलग्रस्त भागाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
>>प्रणव पाटील

राज्य वाङ्मय पुरस्कार 2019 जाहीर झाला. या पुरस्कारप्राप्त पुस्तकांमध्ये साधना प्रकाशनची दोन पुस्तकं होती. यात पहिलं पुस्तक होतं ते म्हणजे ‘बिजापूर डायरी’. हे पुस्तक छत्तीसगढमधील एका मराठी स्त्रीरोगतज्ञ असलेल्या डॉ.ऐश्वर्या रेवडकर यांच्या अनुभवावर आधारित आहे. मागे गेली अनेक महिने ‘साधना’च्या साप्ताहिकात ऐश्वर्या रेवडकर या लेख मालिकेतून हा अनुभव वाचकांपर्यंत पोहोचवत होत्या. ते सर्व लेख आता या पुस्तकाच्या रूपात आपल्या भेटीस आले आहेत.

छत्तीसगढ म्हटलं की, अनेक आदिवासी समूह आणि आदिवासी संस्कृतीने नटलेला भाग असं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं आणि त्यातल्या त्यात तेथील बस्तर हा भाग म्हटला की, राहुल पंडितचं ‘हॅलो बस्तर’ हे गाजलेलं पुस्तक आठवतं आणि या पुस्तकातून बस्तरच्या नक्षलवादी प्रतिमेची आठवण येते. तसा बस्तर म्हणजे आदिवासीबहुल आणि खुप दुर्गम भाग आहे वगैरे हे अनेक वेळा वर्तमानपत्रांत वाचलेलं आठवतं. या बस्तरमधे असलेलं दंडकारण्य म्हणजे नक्षलवाद्यांचा बालेकिल्लाच!

या भागातील नारायणपूर, दंतेवाडा, बिजापूर आणि सुकामा हे जिल्हे सतत नक्षली कारवायांनी प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. या भागात बिजापूर नावाचा जिल्हा आणि त्याचे जिल्हाधिकारी म्हणून पुण्याचे अय्याज तांबोळी यांची नियुक्ती होते काय आणि या नवीन जिल्हाधिकाऱयांनी बिजापूर बदलाचा ध्यास घेतात काय, ही माझ्यासाठी नवीनच माहिती होती. यात प्रमुख भूमिका वठवली ती जिल्हा रुग्णालयाने. तसे तांबोळी हे शिक्षणाने डॉक्टरच आहेत. त्यामुळे त्यांनी आरोग्य व्यवस्थेवर विशेष भर देऊन ठिकठिकाणी स्थानिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रशासनाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी स्त्रीरोगतज्ञ म्हणून ऐश्वर्या रेवडकर रुजू झाल्यानंतर त्यांना या परिसरातील आदिवासी लोकांचा, स्थानिक प्रशासन, नक्षल्यांच्या हिंसेमुळे पीडित झालेले लोक, इतर गैरसरकारी संस्था यांचा सहवास मिळाला. त्या अनुभवाच्या शिदोरीतून हे पुस्तक साकार झालं आहे.

यात सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये नक्षलग्रस्त भागात विकासाचे वारे कसे पोहोचत आहेत, स्थानिक आदिवासी महिला, त्यांचे आजार, कुटुंब नियोजन नसल्यामुळे सततची बाळंतपणं, गंभीर जखमी असतानाही त्यांचं धैर्य, लहान मुलीचं भावविश्व आणि शालेय शिक्षणाची परिस्थिती, सरकारी रुग्णालयाची बदललेली परिस्थिती आणि त्यात वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेले डॉक्टर यांच्यावर आधारित लेख आहेत. यानंतरच्या लेखांमधे सरकारी रुग्णालयाबाहेरील जग, त्यातील लोक, विविध दुर्गम भागातील स्वास्थ्य शिबिरे, कुटरू वा जांगला या गावांची भेट, पंतप्रधान मोदींची बिजापूर भेट, बासागुडा ठिकाणची भेट, जंगल आणि पाऊस, बेदरे या जंगलातील सुंदर निसर्गरम्य, परंतु नक्षलग्रस्त भागाचे दर्शन इ. वर्णनपर लेखांमुळे पुस्तक खालीच ठेवावेसे वाटणार नाहीत असे वाचनीय अनुभव आहेत.

यातील महत्त्वाचे काही लेख आहेत, त्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणारे डॉ.रामचंद्र गोडबोले आणि सुनीताताई गोडबोले या दांपत्याचे बारसूरसारख्या भागातील मुंबईतील सुखवस्तू आयुष्य सोडून चाललेले काम. याशिवाय सलवा जुडूम, बिजापूर स्पोर्टस् अकादमीचे काम, ‘बचपन बनाओ’ संस्थेचे काम, पोर्टा केबिन्समधील नक्षली भागातून राहायला आलेली मुलं आणि या पोर्टा केबिन्सची स्थिती, दंतेवाडा भाग, आठवडी बाजार आणि बाजारात मिळणारे पदार्थ, स्थानिक फळे, वेगवेगळ्या पदार्थांनी बनवलेली मद्यं, इतर पदार्थ, बस्तर पर्यटन आणि शेवटचे प्रकरण म्हणजे वनभैसाच्या शोधातील भटकंती आणि हेमलकसा भेट ही प्रकरणे शेवटची आहेत. यानंतर पुस्तक संपूच नये असं वाटतं. यादरम्यान स्थानिक डॉक्टरांचे आयुष्य, त्यांची सुखदुःख, त्यांची मनोरंजनाची साधने, याबरोबर सरकारी रुग्णालयातील एकाहून अधिक भयानक गुंतागुंतीच्या शस्त्र्ाक्रिया यामुळे पुस्तक वाचताना आपण डॉ. रेवडकरांच्या बरोबरच हे सगळं अनुभवतो आहोत असंच वाटतं. बस्तरसारखा भाग हे पुस्तक वाचल्यानंतर नक्की बघायला जावा असंच पुस्तक संपल्यानंतर वाटत राहतं. स्थानिक स्तरावरील आदिवासींचे आयुष्य, त्यातही मुख्यतः आदिवासी महिलांचे आयुष्य आणि भावविश्व, नक्षल्यांमुळे उद्ध्वस्त झालेले जनजीवन, ओस पडलेली खेडी, स्थानिक प्रशासनाचे कार्य या सर्वांची विश्वासार्ह माहिती या पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल लेखिकेचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.

बिजापूर डायरी
लेखिका – डॉ. ऐश्वर्या रेवडकर
प्रकाशक – साधना प्रकाशन
पृष्ठs – 184, मूल्य – रुपये 200/-