
राज्य शासनासह महानगरपालिकेच्या कोरोना नियमावलीनुसारच पुणे शहरात गणशोत्सव साजरा करण्यात आला. विशेषतः सार्वज्निक गणेशोत्सव मंडळांसह नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यामुळे उत्सव शांततेत पार पडला आहे. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.
गणेशोत्सवासाठी पुण्यात दरवर्षी भाविकांसह मंडळांची मोठी धामधुम सुरू असते. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाच्या संकटामुळे अतिशय साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला जात आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही शासनाकडून गणेशोत्सव आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यानुसार सार्वजनिक मंडळांनी बाप्पांचे ऑनलाईन दर्शनासह मंडपामध्ये भाविकांची गर्दी होणार नसल्याची काळजी घेतली.
त्याशिवाय पुणेकरांनीही पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, गर्दी न करता नियमांचे पालन केले. विशेषतः बाप्पांचे विसर्जनासाठी मिरवणूका न काढता, जागेवरच विसर्जन केले. त्यामुळे रस्त्यांवरील गर्दी दिसून आली नाही. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांनी सभामंडपालगत असलेल्या हौदात बाप्पांचे विसर्जन केले. तर शहरातील विविध सोसायट्या आणि घरगुती गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी महापालिकेने वाहनांवर फिरत्या हौदाची सोय उपलब्ध केली होती. दरम्यान, विसर्जनासाठी पोलिसांनी 7 हजारांवर फौजफाटा तैनात केला होता.
असा होता पोलिसांचा बंदोबस्त
होमगार्ड- 450, एसआरपीएफ- 4 तुकड्या दंगल विरोधी 10 पथके, बॉम्ब शोधक व नाशक 8 पथके, शीघ्र कृती दल 16 पथके, सर्व पोलीस ठाण्यातंर्गत 1 हजार 100 कर्मचारी, गुन्हे शाखेतील 200 कर्मचारी, विशेष शाखेतील 100 कर्मचारी, स्ट्रायविंâग फोर्स 10 पथके, गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेची 20 पथके, विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ ) 1 हजार 200 पोलिसांच्या मदतीला उभे होते.
वाहतूक नियमनातही कमरता नाही- वाहतूक उपायुक्त
गणेश विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागात येणारे रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले होते. त्यामुळे बाहेरील गर्दी थांबविण्यात वाहतूक पोलिसांना यश आले. त्याशिवाय चौकाचौकात वाहतूक नियमनासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तब्बल 1 हजारांवर वाहतूक कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. विशेषतः मध्यवर्ती भागातील वाहतूक नियंत्रित करण्यावर प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे मानाचे गणपती आणि शहरातील नावाजलेल्या गणपती मंदीर परिसरातील वाहतूककोंडी झाली नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी दिली.
मानाच्या गणपती मंडळात कडक बंदोबस्त
शहरातील मानाचे गणपती आणि महत्वाच्या सार्वजनिक गणशोत्सव मंडपामध्ये पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. साध्या वेशातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्याशिवाय गुन्हे शाखेकडून दहशतवादी कारवाईच्या पाश्र्वभूमीवरही 20 जणांचे पथक दरदिवशी पेट्रोलिंगसाठी तैनात करण्यात आले होते. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून वेळोवेळी तपासणी करण्यात आली. विशेषतः पुणेकरांसह सार्वजनिक मंडळांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक आभार व्यक्त करीत असल्याचे डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.























































