पुण्यात 4 लाख 32 हजार घरगुती बाप्पांचे विसर्जन; 12 तास सुरू होता सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील तब्बल 4 लाख 32 हजार 548 घरगुती बाप्पांचे फिरत्या हौदांमध्ये विसर्जन करण्यात आले. त्याशिवाय 3 हजार 493 सार्वजनिक गणशोत्सव मंडळांनी मंडपालगत केलेल्या हौदांमध्ये बाप्पांचे विसर्जन केल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. बाप्पांच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत पोलिसांनी गस्तीसह सुरक्षिततेवर भर दिला होता. त्यामुळे किरकोळ घटना वगळता अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

शहरातील मानाच्या आणि महत्वाच्या गणशोत्सव मंडळांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानुसार राज्य शासनासह महापालिकेच्या कोरोना नियमावलीनुसार उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील एकूण मानाच्या 3 हजार 540 मंडळांपैकी 3 हजार 493 मंडळांनी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली होती. त्याशिवाय 4 लाख 32 हजार 548 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणेश विसर्जनाला शहरात मानाच्या पाचही गणपतींचे दुपारी 1 वाजून 37 मिनीटापर्यंत विसर्जन करण्यात आले. तर शेवटचा गणपतीचे 11 वाजून 25 मिनीटांनी विसर्जन करण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्यात आले होते.