
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण 80 टक्के भरले आहे. उजनीवरील सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत. उजनीच्या खोऱ्य़ात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे विसर्ग कमी झाला आहे. गेल्या तीन दिवसांत 10 टक्के पाणी वाढले आहे.
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनीची पाण्याची टक्केवारी वेगाने वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल 10 टक्के पाणी वाढले आहे. गुरुवारी (दि. 16) उजनीत 80.22 टक्के इतका उपयुक्त साठा होता. बंडगार्डन, दौंडमधून मोठ्या प्रमाणावरील विसर्गामुळे हा लाभ झाला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात उजनी धरण 111 टक्के भरले होते. यंदा सप्टेंबरच्या मध्यावर हे धरण 80 टक्केच भरले आहे. सध्या उजनतीत 106 टीएमसी पाणीसाठा असून, यातील 43 टक्के पाणीसाठा उपयुक्त पातळीत आहे. खडकवासला येथील विसर्ग बंद झाला असून, बंडगार्डन येथील विसर्ग मंदावला आहे. उजनी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी 30 टक्के पाण्याची म्हणजेच 15 टीएमसी पाण्याची गरज आहे. उजनीवरील सर्व धरणे 100 टक्के भरली असून, भीमा खोऱ्य़ातील पावसाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




















































