
नगर-पुणे महामार्गावर दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात बाप-लेकासह चारजण जागीच ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये दोन दुचाकीस्वार व मालमोटार चालक व त्याच्या सहायकाचा समावेश आहे. अपघात एवढा भीषण होता की अपघातग्रस्त ट्रकचा चक्काचूर झाला. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मालट्रक चालक शुभम राजू देशभ्रतार (वय 24, रा. दुधाडा, ता. कटोल, नागपूर), सहायक राहुल मधुकर डोंगरे (वय 31, रा. सावली, ता. कारंजा, जि. वर्धा) या दोघांसह दुचाकीवरील राजाभाऊ विष्णू चव्हाण (वय 50, रा. जातेगाव, ता. गेवराई, बीड) व त्यांचा मुलगा पुरुषोत्तम (वय 18) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
जे. के. ट्रान्स्पोर्ट व के. टी. ट्रान्स्पोर्ट कंपनीचे दोन मालट्रक एकामागोमाग एक पुण्याहून नगरच्या दिशेने निघाले होते. के. टी. कंपनीच्या मालट्रकचा मागचा टायर फुटल्याने चालकाने अचानक गाडी थांबवली. या ट्रकमागे दुचाकी चालली होती, तर दुचाकीच्या मागे लोखंडी पाइप भरलेला ट्रक भरधाव वेगात येत होता. पुढचा ट्रक थांबल्याने मागील ट्रकचालकाने जोरात ब्रेक दाबला. त्या धक्क्याने ट्रकमधील लोखंडी पाइप चालकाच्या केबीनमध्ये शिरले. यामध्ये चालक व सहायकाचा जागीच मृत्यू झाला. या ट्रकने दुचाकीवरील बाप-लेकालाही चिरडले. त्यानंतर तो समोरच्या ट्रकला जाऊन धडकला.
अपघाताची माहिती मिळताच, सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गोकावे पथकासह घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त मालट्रक रस्त्याच्या बाजूला काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. के. टी. कंपनीच्या ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



























































