
शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन भावांसह तीन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगावात सोमवारी दुपारी ही घटना घडली. बुडालेल्या मुलांमध्ये एक दुसरी व एकजण चौथीत शिकत होता.
दत्ता अनिल माळी (वय 8), चैतन्य अनिल माळी (वय 10), चैतन्य श्याम बर्डे (वय 8) अशी मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. रविवारी कोन्हेगावातील नागरिकांनी अतुल खरात यांच्या शेततळ्यात गणेशमूर्तीचे विसर्जन केले. सोमवारी दुपारी दत्ता, चैतन्य या दोन भावंडांसह चैतन्य शाळेत चाललो, असे घरी सांगून शेततळ्यावर गेले. पाणी खेळण्यासाठी तलावात उतरले. कुणालाही पोहता येत नसल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना कळविली. पोलिसांनी मुलाचे मृतदेह तळ्यातून बाहेर काढले. पंचनामा करून शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत पावलेली लहान मुले गरीब कुटुंबातील आहेत. सुरुवातीला गणेशमूर्ती शोधासाठी गेल्याची चर्चा होती; परंतु खेळता खेळता मुले तलावाजवळ गेली आणि पाण्यात बुडून मरण पावल्याचे पोलीस निरीक्षक साळवे यांनी सांगितले.























































