पोलीस असल्याची बतावणी करत ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्राईम ब्रॅन्चचे पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ दाम्पत्याला लुटल्याची घटना सोमवारी दुपारी वडगाव पुल परिसरात घडली. आरोपींनी त्यांच्या एटीएम कार्डवरून पैसे काढल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 62 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे मुळचे सांगलीचे असून त्यांचे घर वाकड परिसरात आहे. सोमवारी दुपारी ते सांगलीवरून खासगी वाहनाने वडगाव पुल येथे उतरले होते. वाकडला जाण्यासाठी शेअर रिक्षाची वाट पहात थांबले होते. त्यावेळी एक कारमधून चार व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यापैकी पुढे बसलेल्या दोघांनी ते क्राईम ब्रॅन्चचे पोलीस आहेत, असे सांगितले. तर, पाठीमागे बसलेल्या दोघांनी आर्मीत असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. काही वेळाने आमचे साहेब येणार आहेत. त्यामुळे तुम्ही अंगावरील सोन्याचे दागिने, एटीएम कार्ड, त्याचा पीन क्रमांक लिहून लिफाप्यात ठेवण्यास सांगितले. त्यासाठी त्यांनी लिफाफा दिला. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांनी घाबरून त्यांच्या म्हणण्या प्रमाणे दागिने व एटीएम कार्ड त्यामध्य टाकून त्यांच्याकडे दिले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या हवाली दुसराच लिफाफा देत पसार झाले.

ज्येष्ठ दाम्पत्याने काही वेळाने लिफापा उघडून पाहिला असता त्यामध्ये दागिने व एटीएम कार्ड नसल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यावेळी त्यांना त्यांच्या एटीएम कार्डवरून आरोपींनी 24 हजार रूपये काढल्याचे आढळून आले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.