गिरीप्रेमींचे तीन दशकांचे स्वप्न झाले पूर्ण, मंदा शिखरावर तिरंगा फडकवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केदारगंगा खोऱयातील ‘मंदा 1’ या शिखराच्या माथ्यावर गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी विजयी पताका फडकावली आहे. तब्बल 32 वर्षांनंतर हिंदुस्थानातील गिर्यारोहकांनी हे यश मिळवले आहे. 6510 मीटर उंच आणि चढाईसाठी अत्यंत आव्हानात्मक असणाऱया शिखरावर केलेल्या चढाईबद्दल गिरीप्रेमींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गिरीप्रेमींच्या 10 जणांच्या टीमने 24 ऑगस्ट रोजी मोहिमेला सुरुवात केली. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली. ते स्वतः या मोहिमेत सहभागी झाले. त्यातील सुमित मांदळे, पवन हडोळे, विवेक शिवदे या तिघांनी ‘मंदा 1’ शिखरावर चढाई केली. सततचे रॉक फॉल, निमुळत्या धारेवरून चढाई, 70 ते 80 अंश कोनातील चढाई, खराब हवामान इत्यादी आव्हानांचा सामना करत त्यांनी 18 सप्टेंबरला शिखरमाथा गाठला. 20 वर्षांचा निकुंज शहा या सर्वात तरुण गिर्यारोहकाचा मोहिमेमध्ये मोलाचा सहभाग होता.

हिमालयातील केदारगंगा व्हॅलीतील ‘मंदा 1’ शिखर तांत्रिकदृष्टय़ा चढाईसाठी अत्यंत कठीण शिखर आहे. 1982 मध्ये जपानी गिर्यारोहकांनी शिखर सर केले होते. गिरीप्रेमी संस्थेकडून 1989 आणि 1991 चढाईसाठी प्रयत्न झाले होते. मात्र त्यात यश आले नव्हते. हे शिखर सर करणे तीन दशकांपासूनचे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाले. हिंदुस्थानच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये या शिखरावर तिरंगा फडकवण्याचे भाग्य गिरिप्रेमी संस्थेला लाभले. – उमेश झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक, पुणे

-‘मंदा 1’ शिखराची उत्तर धार ही अत्यंत धोकादायक व आव्हानात्मक आहे. निमुळत्या आकाराची तीव्र उतार असलेल्या उत्तर धारेच्या मार्गाने एकही हिंदुस्थानी गिर्यारोहण मोहीम यशस्वी झालेली नाही. त्यामुळे गिरीप्रेमींच्या संघासमोर मोठे आव्हान होते.

– माऊंट मंदा 1 मोहिमेसोबतच केदारगंगा व्हॅलीत असणारे 6041 मीटर उंच असलेले माऊंट भ्रिगू पर्वत या शिखरावरही गिरीप्रेमींच्या दुसऱया संघाने यशस्वी चढाई केली. आनंद माळी, वरुण भागवत, रोहन देसाई, ऋतुराज अगवणे, अंकित सोहनी यांनी भ्रिगू पर्वत शिखरमाथा सर केला.