
क्रिकेटमध्ये पुरुष व स्त्री यांच्यामध्ये समानता असायला हवी यासाठी मेरिलीबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) या क्रिकेटचे नियम तयार करणाऱया संस्थेने बुधवारपासून नव्या नियमाचा श्रीगणेशा केला आहे. नव्या नियमानुसार आता क्रिकेटमध्ये बॅट्समनला ‘बॅटर’ असे संबोधण्यात येणार आहे.
एमसीसीकडून यावेळी सांगण्यात आले की, पुरुष व महिला या दोन्हींसाठी उपयुक्त ठरणारा शब्द वापरण्यात आल्यास क्रिकेटचा दर्जा आणखी सुधारू शकतो. याआधीपासूनच यावर विचार सुरू होता. खेळामध्ये समानता असायला हवी याची जबाबदारी आमच्याकडे होती. महिला क्रिकेटही विकास करीत आहे. जगभरातील असंख्य महिलांची पावले या खेळाकडे वळावीत यासाठी बदल आवश्यक होता, असेही यावेळी सांगण्यात आले.
बॅट्सवुमन अन् वुमन ऑफ दी मॅच
पुरुषांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजाला बॅट्समन असे संबोधत असत. तसेच लढतीतील सामनावीराच्या पुरस्काराला ‘मॅन ऑफ दी मॅच’ असे संबोधत असत. महिला क्रिकेटमध्ये मात्र बॅट्सवुमन आणि ‘वुमन ऑफ दी मॅच’ असे म्हणावे लागत होते. आता दोन्ही गटांतील क्रिकेटमध्ये फलंदाजाला ‘बॅटर’ असे संबोधण्यात येणार आहे.
बॉलर अन् फिल्डरप्रमाणेच
याआधी गोलंदाजाला बॉलर तसेच क्षेत्ररक्षकाला फिल्डर असे संबोधत असे. आता फलंदाजालाही बॅट्समनऐवजी बॅटर असे संबोधले जाणार आहे. एमसीसीचे सहाय्यक सचिव जेमी कॉक्स यावेळी म्हणाले, नव्या नियमासाठी ही योग्य वेळ आहे. त्यामुळे याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे.























































