
नगर जिह्यात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या सहाव्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी राहुरीतील असून टोळीप्रमुखासह पाचजणांचा या कारवाईत समावेश असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे. टोळीप्रमुख सुरेश रणजित निकम (वय 28), विकास बाळू हनवत (वय 24), सागर शिवाजी जाधव (वय 30), सतीश अरुण बडे (वय 28, सर्व रा. कात्रड, ता. राहुरी), करण नवनाथ शेलार (वय 19, रा. मोरे चिंचोरे, ता. नेवासा) अशी या गुन्हेगारांची नावे आहेत.
नगर जिह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पाच टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या टोळ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर ‘मोक्का’ कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार राहुरी तालुक्यातील सुरेश निकम याच्या टोळीविरुद्ध प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
आरोपी निकमविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या टोळीतील सदस्यांची नावे निष्पन्न झाली होती. या टोळीने नेवासा हद्दीमध्ये अनेक गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानंतर एमआयडीसी व सोनई पोलीस ठाण्याकडून या टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. अधीक्षक पाटील यांनी 13 जुलै रोजी हा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला आज मंजुरी देण्यात आली आहे.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळीविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. अशाप्रकारे नगर जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांविरुद्धही आगामी काळात ‘मोक्का’ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
– मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, नगर






























































