सहजसुंदर मांडणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अस्मिता प्रदीप येंडे

अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी,
धरिता ही परि आवरेना।।

संत तुकाराम महाराजांनी आपल्या या अभंगातून किती सहजपणे मन आणि आचरण यातील सहजता व्यक्त केली आहे. साहित्य हे लेखकाच्या मनाचे प्रतिबिंब असते. जे मनात असते तेच त्याच्या लेखणीच्या माध्यमातून उलगडत असते. अशाच एका लेखकाने आपले अंतरंग आपल्या लेखणीतून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. लेखक श्रीकांत कवळे लिखित ‘अंतरंग मनाचे’ हे पुस्तक निर्मळ, नितल आठवणींची रेखीव नक्षीच आहे. शारदा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

लेखक श्रीकांत कवळे हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे बालपण अलिबाग तालुक्यातील सारळ या गावी गेले. त्यांचे वडील स्वातंत्र्याच्या लढय़ात सहभागी होते. आईची थोर सावली, सद्गुरू वामनराव पै यांची शिकवण अशी पार्श्वभूमी, संस्कार लाभलेल्या लेखक श्रीकांत कवळे यांच्या निर्मळ तितकेच खंबीर मनाची सावली त्यांच्या या पुस्तकात पसरली आहे. त्यांनी केलेल्या संघर्षाची, कष्टाची, मेहनतीची प्रचीती पदोपदी जाणवत राहते.

कथा विभागात अतिशय सुरेख आणि वैचारिक संदेश देणाऱया कथा वाचावयास मिळतात. ‘एकटी’ या कथेत निर्मलाताई निंबाळकर यांच्या संघर्षाची गोष्ट मांडली आहे. ‘एक डाव धीराचा’ कथेतून अनिष्ट प्रथेतून स्त्रियांची होणारी कुचंबना दर्शवलेली आहे. ‘सोमवार’ या काल्पनिक कथेतून यमराज आणि चित्रगुप्त यांच्या अति कामामुळे उडणारी तारांबळ चित्रित झाली आहे. ललितलेखांमध्ये छोटय़ा-छोटय़ा लेखांतून सहज, सुंदर अशी शिकवण, संदेश मिळतो. संस्कार, नीति-मूल्य, मैत्री, संघर्ष, युद्ध, चांगुलपणा, आशावाद, दुसरी बाजू अशा लेखांतून साध्या-सोप्या शब्दांत उदाहरणे देऊन मूल्यांचे महत्त्व तसेच नात्यांचे महत्त्व पटवून दिले आहे. घटस्फोट, नात्यांमधील स्पेस, विधवा-दुर्दैवी वैधव्य अशा लेखातून वास्तव मांडले आहे. लेखांच्या पुढील भागात लेखकाने आपले बालपण, आजूबाजूचा परिसर, मित्र-परिवार, आपले कुटुंब, सारळ गावातील उत्सव, जत्रा, मित्रांसोबत केलेली कनकेश्वरची पिकनिक, नाटकात केलेले काम, महाविद्यालयीन जीवन, नोकरीसाठी केलेला संघर्ष, नोकरीच्या पहिल्या दिवशी आलेला अनुभव, अनेक आनंददायी आणि हळवे क्षण या पुस्तकात टिपले आहेत. ‘अंतरंग मनाचे’ हे शीर्षक अगदी समर्पक आहे. संपूर्ण पुस्तकातून लेखकाचा प्रवास झरझर पुढे सरकत जातो. सकारात्मकता आणि जीवन जगण्याची उमेद भरभरून यात दिसून येते. लेखक श्रीकांत कवळे यांचे लेखन शिकवण देणारे आहे.

‘अंतरंग मनाचे’ पुस्तकाद्वारे लेखक मनापासून व्यक्त झाला आहे. जे मनात तेच कृतीत आहे. जे खरे ते सहजपणे रिते केले आहे. स्व-स्वभाव कधी लपून राहत नाही. विचार कृतीतून झळकतातच, ही प्रचीती देणारे हे पुस्तक आहे.

अंतरंग मनाचे
लेखक – श्रीकांत कवळे
प्रकाशक – शारदा प्रकाशन
मूल्य – रुपये 150/-