
बीडमध्ये एक दुर्देवी घटना समोर आली आहे. तुटलेल्या पुलावरुन नदी पार करताना एका इसमाचा पाय घसरुन पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9च्या सुमारास घडली. या घटनेने गावकरी आक्रमक झाले असून इसमाचा मृतदेह गेवराई रोडवर ठेवून ठिय्या आंदोलन केले. यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुदर्शन संदिपान संत (35) असे त्याचे नाव आहे.
गेवराई तालुक्यातील भोजगाव गावालगत अमृता नदी आहे. दरम्यान तळणेवाडी फाटा ते भोजगाव दरम्यानचा अमृता नदीवरील पुल ऑक्टोबर 2019 मध्ये पावसाळ्यात खचला होता. सदरील पुलाची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधीत विभाग तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यातच गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये सतत जोरदार पावसामुळे खचलेला पुल पुरता वाहून गेला. यावेळी रात्री उशिरा गावाकडे परतणारे भोजगाव येथील महादेव संत (40) यांना पाण्याचा अंदाज न आल्याने खचलेल्या पुलात वाहून गेले होते. यानंतर त्यांचा तब्बल 15 तासानंतर मृतदेह सापडला होता.
दरम्यान वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुल दुरुस्तीची मागणी करुनही तो न केल्यानेच महादेव संत यांचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत पुलावरच ठिय्या मांडला होता. जोपर्यंत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. यानंतर याठिकाणी आ. लक्ष्मण पवार, पोलीस, महसूल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होऊन त्यांनी लवकरच पुल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. यानंतर देखील पुल दुरुस्ती न झाल्याने शेवटी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या पुलाची दुरुस्ती केली. मात्र यावर्षी जुलैमध्ये जोरदार पावसाने नदीला पूर आला आणि दुरुस्ती केलेला पुल पुन्हा वाहून गेला. तेव्हापासून ग्रामस्थांची पुलावरील रहदारी बंद असून दळणवळणाचा प्रश्न गंभीर आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी गावातील निकिता दिनकर संत (17) या मुलीने आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जाताना अक्षरशः नातेवाईकांना तो खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागल्याने अखंड महाराष्ट्राचे मन हेलावून गेले होते. त्यातच रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निकिताला सावडण्यासाठी निघालेला गावातील तरुण सुदर्शन संदीपान संत (35) हा पुलच नसल्याने कठड्यावरुन नदी पार करत होता. यावेळी पाय घसरून तो नदीत पडून वाहून गेला त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह धोंडराई येथील पुला जवळ आढळून आला.
या पुलाने आतापर्यंत दोन बळी घेतले आहेत. दरम्यान येथील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न बिकट असताना देखील प्रशासन, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी संत यांचा मृतदेह शेवगाव गेवराई रोड वर आणून ठेवला असून जोपर्यंत या पुलाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मिळणार नाही अशा आक्रमक पवित्रा मुळे रस्ता बंद झाल्याने शेवगाव गेवराई दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत तर अजून किती बळी गेल्यानंतर हा पूल दुरुस्त होईल असा प्रश्नदेखील सर्वांना पडला आहे.




























































