पुण्यात 10 हजारांवर बेशिस्त रिक्षाचालकांची झाडाझडती, पोलिसांकडून कारवाईचा बडगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

पुणे शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार महिन्याभरात तब्बल 10 हजार 856 हून अधिक रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रामुख्याने लायसन्स नसणे, बॅच नसणे, विना परमिट प्रवासी वाहतूक करणे, खाकी गणवेश नसणाऱ्या चालकांना कारवाईचा दणका देण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणात रिक्षाचालकांच्या सहभाग असल्यामुळे पोलिसांकडून त्यांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार 1 ते 26 सप्टेंबर कालावधीत वाहतूक कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी तब्बल 8 हजार 502 रिक्षाचा युनीफॉर्म न घालणाऱ्याविरूद्ध दंडात्मक कारवाई केली. त्याशिवाय विना लायसन्स रिक्षा चालविणाऱ्या 1 हजार 605 जणांना कारवाईचा दणका देण्यात आला. बॅच नसणाऱ्या 752 रिक्षाचालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे स्टेशन परिसरासह स्वारगेट, संगमवाडीमध्ये असलेल्या काही बेशिस्त रिक्षाचालकांची मग्रुरी उतरली आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईमुळे बहुतांश रिक्षा थांब्यावर चालकांकडून नियमांचे पालन केले जात असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः ड्रेस आणि बिल्ला लावलेले बहुतांश रिक्षाचालक प्रवाशांना चांगली सेवा देत असल्याचे गुन्हे शाखेच्या ड्राईव्हमध्ये अनुभवास आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवाशांनी ने आण करताना महिलांसह मुलींच्या छेडछाडीच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर आहेत. स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, हडपसर, कात्रज, बाणेर, विश्रांतवाडी, विमानतळ परिसरातील रिक्षाचालकांची झाडाझडती घेण्यात येत आहे. ड्रेस, बॅच, बिल्ला नसणाऱ्यांविरूद्ध थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे चौकाचौकातील रिक्षा थांब्यावर पोलिसांच्या कारवाईची चर्चा जोमात आहे. विशेषतः सर्वाधिक वर्दळ असलेल्या पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर परिसरात रात्री अपरात्री मुलींसह महिलांची छेडछाड होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे वाहतूक कर्मचाऱ्यांकडून कारवाईला प्राधान्य देण्यात आले आहे.

महिन्याभरातील रिक्षाचालकांवरील कारवाई

रिक्षा चालविताना गणवेश नसणे- 8 हजार 502
लायसन्स न बाळगणे- 1 हजार 602
बॅच नसणे- 752
महिन्यातील एकूण कारवाई- 10 हजार 856

सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. विशेषतः रिक्षाचालकांकडून प्रवाशांना देण्यात येणारी वागणूक मोडीत काढण्यावर भर देण्यात आला आहे. लायसन्स, बॅच, गणवेश, परमिट नसणाऱ्या रिक्षा चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– राहूल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्याने खबरदारी घेण्याच्या सूचना प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पुणे शहर पहिल्यासारखेच सुरक्षित असल्याचे दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर