खड्डे बुजवण्यासाठी सहाय्यक आयुक्त, अभियंत्यांना ‘रस्त्यावर’ उतरण्याचे आदेश!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी सहायक आयुक्त आणि रस्ते अभियंत्यांनी स्वतः आपापल्या हद्दीत फिरून खड्डे बुजवण्यासाठी कार्यवाही करावी आणि दिसलेला खड्डा त्याच दिवशी बुजवावा, असे सक्त निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले. पुढील दोन ते तीन आठवडे खड्डे बुजवण्याला प्राधान्य देऊन काम करावे असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय रस्ते अभियंत्यांना अतिरिक्त कामातून तातडीने मुक्त करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

पालिका प्रशासनाने मुंबई महानगरात एप्रिल 2021 पासून आतापर्यंत सर्व रस्त्यांवर मिळून 40 हजारपेक्षा जास्त खड्डे बुजविण्याची कामगिरी केली आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेला पाऊस आणि रस्त्यांवर वाढलेली वाहतूक यामुळे खड्डे निर्माण होण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. त्यामुळे युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याची कार्यवाही सर्व प्रशासकीय विभाग कार्यालये आणि रस्ते विभाग यांनी संयुक्तपणे सुरू करावी आणि खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचे काम करावे असे निर्देश आयुक्तांनी आज दिले. रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे आणि पावसाळी साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजना यासंदर्भात  आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज ऑनलाइन आढावा बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू यांच्यासह सर्व संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सर्व सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. मुंबईतील यंदाचा पाऊस सुमारे 3 हजार मिलीमीटरपर्यंत पोहाचला असून मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रस्त्यांवरील वाहतूकदेखील वाढली आहे. असे असले तरी कोणतीही सबब पुढे न करता रस्त्यांवर निदर्शनास येणारे खड्डे बुजवून योग्यरीत्या रस्ते परिरक्षीत करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, असे नमूद करून चहल यांनी आवश्यक निर्देश दिले.

अशी कार्यकाही करा

मुंबईतील सुमारे 147 किलोमीटर लांबीचे प्रकल्प रस्ते आणि दोष दायित्व कालावधीतील सुमारे 625 किलोमीटर रस्ते अशा एकूण 772 किलोमीटर रस्त्यांचे परिरक्षण योग्यरीत्या होण्यासाठी संबंधित कंत्राटदार / मध्यवर्ती यंत्रणा यांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. या रस्त्यांवर खड्डे राहणार नाहीत यासाठी तातडीने कार्यवाही करावी. याव्यतिरिक्त राहिलेले म्हणजे सुमारे 1 हजार 087 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी युद्धपातळीवर कार्यवाही हाती घ्यावी.

 मागील सुमारे दीड वर्ष अथक प्रयत्न करून आरोग्य यंत्रणेने कोविड विषाणूची साथ आता पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. तथापि, काही प्रमाणात पावसाळी साथ आजारांनी डोके वर काढल्याचे आढळते आहे. विशेषतः डेंगी आजाराबाबत अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ज्या ज्या ठिकाणी डासांचे उत्पादन होण्याची शक्यता आहे त्या सर्व ठिकाणी डास प्रतिबंधक व डास निर्मूलन उपाययोजनांना वेग द्यावा. ज्या प्रशासकीय विभाग किंवा परिसरांमध्ये जास्त रुग्ण आढळत असतील तिथे कार्यवाहीचा वेग वाढवावा, असे निर्देशही आयुक्तांनी दिले.