दादरचा धावपटू मयुरेशला हवाय मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर येथील एच. एम. पाटील मार्गावरील जसोटा कुटीर येथे वास्तव्य करणाऱया मयुरेश कमलाकर वालम या 24 वर्षीय युवकाने ‘नाशिक – त्र्यंबकेश्वर – नाशिक शहर’ या अल्ट्रा मॅरेथॉनमधील 100 किमीचे अंतर 15 तास अन् 56 मिनिटांमध्ये पूर्ण केले. कोणाच्याही मदतीविना या पठ्ठय़ाने ही करामत करून दाखवली. त्याच्या या कामगिरीचे चोहोबाजूंनी कौतुक करण्यात येत आहे. मात्र मयुरेश वालम याची परिस्थिती बेताचीच आहे. त्याला आर्थिक मदतीचा हात हवा आहे.

मयुरेश वालम याची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. मयुरेश वालम याने 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने काही ठिकाणी नोकरीही केली. मात्र कोरोनाच्या काळात त्याला घरीच बसावे लागले. आईच्या खांद्यावरच घरची जबाबदारी आहे. मयुरेश वालम याला स्वतःच्या मेहनतीच्या जीवावर पुढे जायचे असून कुटुंबालाही सावरायचे आहे.

बाळ गोपाळ मंडळाकडून गौरव

मयुरेश वालम हा बाळगोपाळ मंडळाचाही सक्रिय कार्यकर्ता आहे. या मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात तो हिरीरीने सहभाग घेतो. या मंडळाचे अध्यक्ष अभय महाले यांच्या टीमकडूनही त्याला गौरविण्यात आले हे विशेष. तसेच भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा देण्यात आल्या.

मुंबई-नाशिक शर्यतीत सहभागी होणार

मयुरेश वालम याला धावपटू म्हणून पुढे जायचे आहे. आगामी मुंबई – नाशिक या शर्यतीसाठीही तो सज्ज होत आहे, पण त्याला सध्या नोकरीसह खेळाला लागणाऱया इतर बाबींसाठीही सहकार्य हवे आहे. याप्रसंगी राजकीय नेते, कॉर्पोरेट सेक्टर यांच्यासह इतरांनाही त्याने मदतीचे आवाहन केले आहे.