
पीएमपीएमल बसमधील चोऱ्या तसेच अंधाराचा फायदा घेऊन पादचाऱ्यांना आणि दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनीट एकने पर्दापाश केला. त्यांच्याकडून चोरीचे 10 गुन्हे उघडसकीस आणण्यात आले आहेत. अरुण शिवाजी गायकवाड (वय 38) मोहन गणेश जाधव (वय 30) शिवराज अर्जुन वाडेकर (वय 22) प्रशांत मिठु थोरबोले (वय 22) शितल श्रीनिवास वाडेकर (वय 29 ) भिमबाई रमेश बजंत्री (वय 45 ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मुंढव्यात राहणारे काहीजण टेम्पोतून प्रवास करीत अंधाराचा फायदा घेउन पादचारी, दुचाकीस्वारांची लुटमार करीत होते. संबंधित टोळी डेक्कन नदीपात्रात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अनिकेत बाबर आणि दत्ता सोनावणे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेस संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी यांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. सर्व गुन्हेगार दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. आरोपीनी विश्रामबाग हद्दीत तीन, डेक्कन आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्हे, शिवाजीनगर भारती विद्यापीठ कोथरुड पोलीस ठाण्यातंर्गत प्रत्येकी एक गुन्हा असे 10 गुन्हे केल्याची कबुली दिली. ही कामगिरी एसीपी लक्ष्मण बोराटे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, दत्ता सोनावणे, अनिकेत बाबर, शशीकांत दरेकर, राहुल मखरे, विजेसिंग वसावे, महेश बामगुडे, इम्रान शेख, अजय थोरात, अमोल पवार, अशोक माने, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, मिना पिजंण, रुक्साना नदाफ यांनी केली.

































































