‘मनिके मगे हिते’चं मराठमोळं व्हर्जन, वाहतूक पोलीस आतिष खराडेंचं गाणं चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मनिके मगे हिते’च्या मराठी व्हर्जनबद्दल आतिष खराडे म्हणाले, सध्या मूळ सिंहली भाषेतील गाणे ट्रेंडिंगमध्ये आहे. मी त्याचं मराठी व्हर्जन केलंय. गाणं मीच लिहिलंय. गाणं मोबाईलवर रेकॉर्ड केलं तसंच मित्राच्या घरी शूटिंग केलं. ते लोकांच्या पसंतीस उतरलं आहे. नुकताच डीसीपींनी माझा सत्कार केला आहे.

श्रीलंकन गायिका योहानी हिचे ‘मनिके मगे हिते’ जगभरात प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या गाण्याचे अनेक व्हर्जन आलेत. पुण्यात वाहतूक शाखेत काम करणारे आतिष खराडे या गाण्याचे मराठी व्हर्जन करून चर्चेत आले आहेत. त्यांच्या मराठी ‘मनिके मगे हिते’ गाण्याला आणि् सिंगिंग टॅलेंटला नेटिझन्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वानवडी पुणे येथे राहणारे आतिष खराडे वाहतूक शाखेत पोलीस नाईक आहेत. ते नोकरी सांभाळून गाण्याचा सराव करतात, वाद्य वाजवतात , रॅप गाणं लिहितात आणि ते स्वरबद्ध करतात. आतिष सांगतात, मला गाण्याची आवड लहानपणापासून होती. मी गाण्याचे शिक्षण घेतलेले नाही, पण काही तरी प्रयोग करत असतो. मी गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोशल मीडियावर माझं गाणं अपलोड करायला लागलो. त्याला मित्रमंडळींचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने माझा हुरुप वाढला. काही रोमँटिक गाणी तसेच रॅप गाणी गाऊ लागलो. ट्रफिकमध्ये काम करत असताना तणाव हा असतोच. गाण्यामुळे मी तणावमुक्त राहतो. मला आनंद मिळतो.