
राज्यात 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेपासून मंदिरांसह धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडणार असल्याने पालिका प्रशासनाने मुंबईसाठी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार धार्मिक स्थळांवर एकूण क्षमतेच्या फक्त 50 टक्के उपस्थिती ठेवता येणार आहे. शिवाय सॅनिटायझेशन, मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक राहणार आहे. याबाबत पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज नियमावली जाहीर केली आहे.
कोरोना नियंत्रणात आल्यामुळे राज्य सरकारने गेल्याच आठवडय़ात घटस्थापनेपासून मंदिर आणि धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडण्यास परवानगी जाहीर केली. यामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष दर्शनासाठी आतुरलेल्या भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ही परवानगी देताना कोरोना खबरदारी नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सरसकट लोकल प्रवासाची प्रतीक्षाच!
सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मात्र आयुक्तांनी आपल्या अधिकारात जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत जुनेच नियम कायम राहणार असल्याचे जाहीर केल्याने सरसकट लोकल प्रवासाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
तीर्थप्रसाद वाटप नको, कंटेन्मेंट झोन नसलेल्या ठिकाणचीच धार्मिक स्थळे सुरू
मास्कचा वापर, 6 फुटांचे सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझेशन बंधनकारक राहणार आहे. लक्षणे असलेल्यांनी मंदिरात जाऊ नये. मूर्ती किंवा धार्मिक प्रतीकाला हात न लावता दुरून दर्शन घ्यावे. गर्दी टाळावी.
सहव्याधी असणारे, गरोदर स्त्रीया, 10 वर्षांखालील मुले यांनी शक्यतो धार्मिक स्थळे आणि मंदिरात जाणे टाळून घरीच थांबावे, असे आवाहन पालिकेने केले आहे, परिसरातील स्टॉल, दुकानांत सोशल डिस्टन्स पाळावे, तीर्थप्रसाद वाटू नये.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबादेवीच्या मंदिरात स्वच्छता केली जात आहे.
मुंबई वगळता राज्यभरात गरबा खेळता येणार
कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही मुंबईकरांना गरबा खेळता येणार नसला तरी कोरोना नियमांचे पालन करून मुंबईवगळता राज्यभरात गरबा खेळण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची मान्यता आहे. खुल्या मैदानात, सभागृहांमध्ये गरबा खेळला जातो. खुल्या मैदानात गरबा खेळताना सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा वापर करण्याबरोबरच गरबा खेळणाऱयांनी लसीचे दोन डोस पूर्ण केलेले असावेत. सभागृहात गरबा खेळताना त्याच्या क्षमतेपेक्षा 50 टक्केच लोक याची दक्षता घ्यावी लागेल. याबरोबरच कोरोना संदर्भातील सर्क नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
































































